शहरातील गुन्ह्यांचा आलेख झपाट्याने वाढला
By Admin | Updated: December 22, 2015 23:55 IST2015-12-22T23:25:19+5:302015-12-22T23:55:58+5:30
औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शहरातील गुन्हेगारीचा आलेख दीडपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहरातील गुन्ह्यांचा आलेख झपाट्याने वाढला
औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शहरातील गुन्हेगारीचा आलेख दीडपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल ५,६५४ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ३५ खून, ५८ बलात्कार, ३०० हून अधिक घरफोड्या तर दोन हजारांवर चोऱ्यांचा समावेश आहे. ८२० वाहने आणि ६३९ मोबाईल चोरट्यांनी पळविले.
औरंगाबाद शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत शहरातील खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, मंगळसूत्र चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी, वाहन चोरी, सरकारी नोकरांवरील हल्ला, अशा गंभीर गुन्ह्यांचा आकडा दीडपटीने वाढला आहे.
पोलीस आयुक्तालयातील सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील विविध भागांत गतवर्षी ३३ खून झाले होते. यावर्षी खुनाचा आकडा ३५ पर्यंत गेला असून, पाच खुनांचा उलगडा झालेला नाही. खुनाचा प्रयत्न करण्याच्या ७९ घटना घडल्या. गतवर्षी या घटनांची संख्या ४८ होती.
५८ महिलांवर बलात्कार झाले आहेत. गतवर्षी २३ दरोडे पडले होेते, तर यावर्षी २४ दरोडे पडलेले आहेत. यापैकी एका घटनेतील आरोपी अद्याप मोकाट आहेत. शस्त्राचा धाक दाखवून लुटमारीच्या यावर्षी १९८ घटना घडल्या. यापैकी १३६ घटनांमधील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. तर गतवर्षी लुटमारीच्या १८६ घटना घडल्या होत्या. गतवर्षी ६६ महिलांचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले होते, तर नोव्हेंबरअखेरपर्यंत ४० महिलांचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले. यापैकी केवळ १६ घटनांमधील चोरट्यांना पकडण्यात आले. घरफोड्यांचे प्रमाणही वाढले असून, गतवर्षी २४२ घरे फोडली. यावर्षी ३०८ घरे फोडून चोरट्यांनी कोट्यवधींचा ऐवज पळविला. यातील ७३ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. चोऱ्यांची संख्याही २००८ पर्यंत आहे. आतापर्यंत ८२० वाहने आणि ६३९ मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले आहेत.