मृत अर्भकास टाकणाऱ्या मातेविरुध्द गुन्हा
By Admin | Updated: August 7, 2014 01:39 IST2014-08-07T01:21:05+5:302014-08-07T01:39:43+5:30
मुरूड : वेळेपूर्वी बाळंत झाल्याने जन्मलेले मृत स्त्री अर्भक दवाखान्याच्या परिसरात टाकून घरी निघून गेलेल्या महिलेविरुध्द मुरूड पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मृत अर्भकास टाकणाऱ्या मातेविरुध्द गुन्हा
मुरूड : वेळेपूर्वी बाळंत झाल्याने जन्मलेले मृत स्त्री अर्भक दवाखान्याच्या परिसरात टाकून घरी निघून गेलेल्या महिलेविरुध्द मुरूड पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील बेबी शाहूराज कांबळे ही सहा महिन्याची गरोदर होती़ वेळेपूर्वीच तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने कोंड येथील सरकारी दवाखान्यात ती दाखल झाली़ मंगळवारी मध्यरात्री तिला कोंड येथून मुरूडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले़ दरम्यान, रस्त्यातच ती प्रसूत झाली तेव्हा बाळ मृत झाले. बाळाला घेऊन ती मुरूड येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल होताच गर्भपात झाल्याचे तिने सांगितल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला दाखल करुन घेऊन तिच्यावर उपचार सुरू केले़ पहाटेच्या वेळी या महिलेने हे मृत अर्भक दवाखान्याच्या मागील भागात टाकून पलायन केले़ बुधवारी सकाळी दवाखान्यातील परिचारीकांच्या नजरेस अर्भक आल्याने त्यांनी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली़ दरम्यान, ही महिला आपल्या गावी पोहोचली होती़ परंतु, घरी गेल्यावर तिला रक्तस्त्रावाचा त्रास सुरू झाल्याने ती पुन्हा कोंडच्या सरकारी दवाखान्यात दाखल झाली़ कोंड येथील डॉक्टरांनी तिला पुन्हा मुरूडच्या ग्रामीण रूग्णालयात आणले़ तोपर्यंत मुरूडच्या दवाखान्यातून पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याने पोलिसांनी महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़ पोहेकॉ बबन टारपे पुढील तपास करत आहेत़(वार्ताहर)