माजी सीईओंसह चौघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: March 18, 2016 00:21 IST2016-03-18T00:21:28+5:302016-03-18T00:21:28+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या बांधकामाच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे बिले उचलून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली

माजी सीईओंसह चौघांविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या बांधकामाच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे बिले उचलून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली औरंगाबाद जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ सुखदेव बनकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, तत्कालीन कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर व कार्यकारी अभियंता विलास जाधव यांच्याविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकाराने जि.प. वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळाखोल्यांची बांधकामे आणि दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आले. नंतर त्याच्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले.
शाळाखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्तीच्या या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी नंतर समोर आल्या. कामे न करताच बिले उचलण्यात आल्याचाही आरोप झाला. विशेष म्हणजे सर्वसाधारण सभेने ही कामे रद्द करण्याचा ठरावही घेतला; परंतु त्यानंतरही या कामाची बिले काढण्यात आली. या कामाबाबत फिर्यादी रऊफ पटेल यांनी माहिती अधिकारात या कामांची माहिती मागविली. त्यात मिळालेल्या माहितीवरून खोल्या बांधकाम आणि दुरुस्तीत बोगस कामे दाखवून बिले उचलून मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी रऊफ पटेल यांनी न्यायालयात याचिकेद्वारे केली होती.
त्यावर न्यायालयाने चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे आदेश क्रांतीचौक पोलिसांना दिले. चौकशीनंतर अखेर क्रांतीचौक पोलिसांनी बुधवारी या गैरव्यवहारात रऊफ पटेल यांची फिर्याद घेऊन तत्कालीन सीईओ सुखदेव बनकर यांच्यासह चौघांविरुद्ध बनावट कागदपत्र तयार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक हेमंत कदम हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.