‘मलईदार’ ठाण्याला ‘डिमांड’; शहर पोलीस दलात बदल्यांचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:30 IST2018-04-17T13:28:57+5:302018-04-17T13:30:52+5:30
शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले.

‘मलईदार’ ठाण्याला ‘डिमांड’; शहर पोलीस दलात बदल्यांचे वारे
- बापू सोळुंके
औरंगाबाद : शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले. आवडत्या ठाण्यात आणि विभागात बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहर पोलीस दलात सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. एकाच ठाण्यात आणि विभागात पाच वर्षे सेवा करणाऱ्या २०० पोलिसांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यासोबतच मालदार पोलीस ठाण्यात आणि आवडत्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी पोलीस प्रशासनाकडे अर्ज केल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजले. बदलीसाठी विनंती करणाऱ्यांपैैकी दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बदली मिळावी, अशी विनंती केली. एमआयडीसी वाळूज ठाण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मागणी गुन्हे शाखेला तर तिसऱ्या क्रमांकाची मागणी वाहतूक शाखेला आहे. यासोबतच दीड पट वेतन मिळणाऱ्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकालाही (बीडीडीएस) चौथ्या क्रमांकाची पसंती आहे.
बॉम्बशोधक आणि नाशक पथकापाठोपाठ एमआयडीसी सिडको, सातारा ठाणे आणि विशेष शाखा आणि पोलीस मुख्यालय असा बदलीसाठी पसंती क्रमांक आहे. सतत बंदोबस्त आणि दाखल होणाऱ्या सर्वाधिक गुन्ह्यांमुळे धावपळीचे ठाणे म्हणून सिटीचौक, क्रांतीचौक आणि मुकुंदवाडी ठाण्याचा उल्लेख होतो, या ठाण्यांत बदलीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.
वृद्ध आई-वडिलांची सेवा करायची आहे...
बदलीसाठी विनंती अर्ज करताना पोलिसांनी विविध कारणे नमूद केले आहेत. शहरातून एमआयडीसी वाळूज ठाण्यात बदली मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ठाण्यापासून घर जवळ आहे अथवा वृद्ध आई-वडिलांची सेवा करायची आहे, अशी कारणे दिली आहेत. विशेषत: आंतरजिल्हा बदलींसाठी प्राप्त अर्जांमध्ये अशी कारणे नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले.
२१ रोजी उडणार बदल्यांचा बार
आयुक्तालय प्रशासनाकडे बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जानंतर तो बदलीसाठी प्राप्त आहे अथवा नाही, याबाबतची खात्री केली जात आहे. शिवाय त्याने अर्जात केलेल्या विनंती आणि उपलब्ध रिक्त जागांचा ताळमेळ बसविण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. २१ एप्रिल रोजी बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्या करताना कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
सांगितले.