पितापुत्रांनी केले धाडस; बिबट्याच्या जबड्यातून वाचविले वासरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 20:14 IST2021-08-28T20:13:20+5:302021-08-28T20:14:09+5:30
सोनसवाडी शिवारातील गट क्र-११ मध्ये शेतात चरत असलेल्या वासराला बिबट्याने हल्ला चढवून जबड्यात पकडले.

पितापुत्रांनी केले धाडस; बिबट्याच्या जबड्यातून वाचविले वासरू
सोयगाव : बिबट्याने हल्ला चढवून जबड्यात पकडलेले वासरू संघर्ष करून पिता पुत्रांनी वाचविल्याने या वासराला पुनर्जन्म मिळाला आहे.दैव बलवत्तर होते म्हणून पितापुत्रांच्या संघर्षाला यश आले आहे. ही घटना शनिवारी सोयगाव येथील सोनसवाडी शिवारात घडली आहे.
सोनसवाडी शिवारातील गट क्र-११ मध्ये शेतात चरत असलेल्या तीन वर्षीय वासराला बिबट्याने हल्ला चढवून जबड्यात पकडले. शेतात काम करणाऱ्या शांताराम वाकडे,गणेश वाकडे आणि सुरेंद्र वाकडे यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच लाठ्याकाठ्यांनी बिबट्याला हुसकावले. आरडाओरडा करत बिबट्याला विचलित केले. मात्र, बिबट्याने जबड्यातील वासराला घट्ट पकडून ठेवले. समोरून येणाऱ्या पाळीव कुत्रा बिबट्या समोर गेला. बिबट्या कुत्र्यावर धावून जाताच जबड्यातील वासरू खाली पडले. वासराने लागलीच शेतकरी शांताराम वाकडे यांच्याकडे धाव घेतली. या संघर्षात बिबट्याच्या जबड्यातील वासरू गंभीर जखमी झाले असून पाळीव कुत्राही गंभीर जखमी झाले आहे.