मतमोजणीचे लागले वेध...
By Admin | Updated: May 11, 2014 00:40 IST2014-05-11T00:28:54+5:302014-05-11T00:40:02+5:30
परभणी : मतमोजणीची तारीख जवळ येत असल्याने राजकीय पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.

मतमोजणीचे लागले वेध...
परभणी : मतमोजणीची तारीख जवळ येत असल्याने राजकीय पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. प्रशासनानेही जोरात तयारी सुरू केली असून, अधिकारी-कर्मचार्यांच्या प्रशिक्षणांना प्रारंभ झाला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात १७ एप्रिल रोजी १७ उमेदवारांचे भवितव्य मतदारयंत्रात बंद झाले होत़े़ मतदानाच्या तारखेनंतर मतमोजणीपर्यंतचा कालावधी मोठा होता़ तब्बल एक महिन्याच्या या काळात जिल्ह्यातील कट्टया कट्टयावर आणि ग्रामीण भागात पारांवर अंदाज बांधले जात आहेत़ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा अंदाज बांधत आहेत़ यावेळेसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना महायुती, राकाँ आघाडी, बसपा, आप यासह १७ उमेदवार रिंगणात होते़ निवडणुकी- दरम्यान अनेक घडामोडी झाल्या़ या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीनंतर प्रत्येक जण अंदाज बांधू लागला़ कोणता मतदारसंघ कोणाच्या पाठीशी याबरोबरच जातीय समीकरणे जोडून विजयाची आकडेमोड केली जात आहे़ निवडणूक चुरशीची झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी दावे केले जात आहेत़ या वेळेसच्या निवडणुकीत कोण विजयी होणार हे सांगणे अवघड जात असल्याने पैजांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते़ १००, २००, ५०० रुपयांपासून ५-१० हजारापर्यंत पैजा लावल्या गेल्या आहेत़ त्यामुळे मतमोजणीची उत्सुकता पक्ष कार्यकर्त्याबरोबरच सर्वसामान्यांनाही लागून राहिली आहे़ १६ मे रोजी परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात मतमोजणी होत आहे़ प्रशासनाने मतमोजणीची तयारी सुरू केली आहे़ पोलिस प्रशासनाच्या वतीने बॅरीकेट्स लावणे तसेच बंदोबस्त लावण्याचे काम सुरू झाले आहे़ जिल्हा प्रशासनाने देखील तयारीला सुरुवात केली आहे़ उमेदवारांच्या भवितव्याची ही लढाई असल्याने बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊन प्रशासन सतर्कतेने मतमोजणीची तयारी करीत आहे़ येत्या शुक्रवारीच मतमोजणी होणार आहे़ मतमोजणीला केवळ सहा दिवस शिल्लक असून, संपूर्ण मतदारसंघातील सर्वांचेच लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे़ (प्रतिनिधी) २५ राऊंड होणार परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, घनसावंगी आणि परतूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत़ प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल असतील़ विधानसभा मतदारसंघनिहाय मोजणी होणार आहे़ एकूण २५ राऊंडमध्ये ही मतमोजणी होईल़ प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि अतिरिक्त सहाय्यक असे तीन कर्मचारी नियुक्त केले आहेत़ ३०० कर्मचारी प्रत्यक्षात मतमोजणीमध्ये सहभागी होणार असून, २०० कर्मचारी अन्य कामासाठी आहेत, असे एकूण ५०० कर्मचारी मत मोजणीसाठी नियुक्त केले आहेत़ सकाळी ८ वाजता प्रारंभ १६ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल़ सुरुवातीला पोस्टल मते मोजली जातील़ त्यानंतर ८़३० पासून ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीला प्रारंभ होणार आहे़ दुपारपर्यंत निकाल हाती येतील, अशी अपेक्षा आहे़ मतमोजणीच्या ठिकाणी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे़ सर्व नागरिकांना निकाल तत्काळ समजावेत, यासाठी काळी कमान आणि अन्य एका ठिकाणी प्रोजेक्टर लावले जाणार आहेत़ तसेच परभणी लोकसभा मतदारसंघाबरोबरच अन्य मतदारसंघातील निकालांची माहिती मिळावी, यासाठी टीव्हीची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे़ कर्मचार्यांना प्रशिक्षण मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना दोन प्रशिक्षण दिले जाणार आहेत़ त्यापैकी पहिले प्रशिक्षण १० मे रोजी पार पडले़ १५ मे रोजी दुपारी ३ वाजता दुसरे प्रशिक्षण होईल़