दोन दिवसांत ३६९ एकरची मोजणी करा
By Admin | Updated: April 28, 2016 00:21 IST2016-04-28T00:01:51+5:302016-04-28T00:21:24+5:30
औरंगाबाद : हर्सूल तलावाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. काही भूमाफियांनी तर तलावाच्या जमिनीवर प्लॉटिंगही पाडली आहे.

दोन दिवसांत ३६९ एकरची मोजणी करा
औरंगाबाद : हर्सूल तलावाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. काही भूमाफियांनी तर तलावाच्या जमिनीवर प्लॉटिंगही पाडली आहे. दोन दिवसांत ३६९ एकर ३७ गुंठे जमिनीची मोजणी करून द्या, अशी मागणी मनपाने बुधवारी भूमिअभिलेख विभागाकडे एका पत्राद्वारे केली. मनपाने २००३ मध्ये जमीन मोजणीसाठीच ८१ लाख रुपये भरले होते. मात्र, त्यावेळी मोजणी पूर्ण झाली नव्हती.
हर्सूल तलावातील पाण्यावर टँकरमाफिया कशा पद्धतीने दरोडा टाकत आहेत यावर ‘लोकमत’ने १७ एप्रिलच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. हर्सूल तलावाच्या साडेतीनशे एकर जागेवर ठिकठिकाणी भूमाफियांनी बळकावल्याचे वृत्त दिले होते. हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी मनपाचे अधिकारी का नकारघंटा वाजवत आहेत आदी मुद्दे प्रकाशात आणले होते. या विशेष वृत्ताची दखल विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी घेतली. मंगळवारी सकाळी ६ वाजता त्यांनी हर्सूल तलावाची पाहणी केली. पाहणीनंतर मनपाला त्वरित जमीन मोजणीचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. हर्सूल तलावाच्या परिसरात झालेली अतिक्रमणेही जमीनदोस्त करावी, प्लॉटिंग निष्कासित करावी, असेही आदेश त्यांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करताना बुधवारी मनपाच्या मालमत्ता अधिकाऱ्यांनी भूमिअभिलेख विभागाला जमीन मोजणी करून देण्याची विनंती केली. मनपाने यापूर्वी ८१ लाख रुपये आपल्या कार्यालयाकडे भरले आहेत.
दोन कोटी रुपये खर्च करून मनपा हर्सूल तलावातील गाळ काढणार आहे. शेतीचा पोत सुधारण्यासाठी दरवर्षी शेतकरी तलावात माती नेण्यासाठी येतात. टँकर आणि भूमाफिया त्यांना हाकलून लावतात. मनपाने मोफत गाळ नेण्यास मुभा द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.