मका क्षेत्र घटून कपाशीची लागवड वाढणार !

By Admin | Updated: June 22, 2014 00:49 IST2014-06-22T00:43:31+5:302014-06-22T00:49:32+5:30

औरंगाबाद : जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला; पण अजूनही पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे.

Cotton plantation will be reduced due to Maize area | मका क्षेत्र घटून कपाशीची लागवड वाढणार !

मका क्षेत्र घटून कपाशीची लागवड वाढणार !

औरंगाबाद : जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला; पण अजूनही पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. दुसरीकडे कपाशी बियाणांची ४० टक्के विक्री झाली आहे, तसेच ७१ हजार २०० मे. टन खताचाही पुरवठा झाला आहे. गेल्या वर्षी मक्याला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी यंदा कपाशी लागवड करण्यास अधिक उत्सुक आहेत. परिणामी, मक्याच्या क्षेत्रात ३० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशीपेक्षा मक्याचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज कृषी विभागाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. येत्या १२ दिवसांत किती पाऊस पडतो यावर कपाशी किंवा मका क्षेत्राची वाढ अवलंबून राहील.
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्यावर्षी ६ लाख ५१ हजार ५०० हेक्टरवर खरीप पेरणी करण्यात आली होती. यंदा ६ लाख ५५ हजार ६०० हेक्टरपर्यंत या खरीप क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विभागीय कृषी विभागाने यंदा कपाशीचे क्षेत्र घटून मक्याचे क्षेत्र वाढणार, असे गृहीत धरून खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. मात्र, बाजारपेठेतील कपाशीची विक्री लक्षात घेता यंदा मक्याचे क्षेत्र घटून कपाशीची लागवड वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी व कंपनीचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. खरीप क्षेत्रातील पेरणीचे परस्पर विरोधी दावे केले जात असले तरीही प्रत्यक्षात येत्या १२ दिवसांत किती पाऊस पडतो यावर खरीप क्षेत्रात वाढ किंवा घट अवलंबून राहणार आहे.
औरंगाबादेत कपाशीनंतर सर्वांत मका सुपरहीट ठरला आहे. दोन्ही पिकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दाम मिळवून दिला आहे. मात्र, मागील वर्षी मक्याला ९०० ते १,२२५ रुपये प्रतिक्विंटलदरम्यान भाव मिळाला होता.
कापूस ४,००० ते ६,५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. विशेष म्हणजे अवकाळी पावसाने काही भागात दुबार कपाशीला फायदाच झाला.
यात कपाशी उत्पादकाने कमावून घेतले. मात्र, दुसरीकडे मका मातीमोल भावात विकावा लागला.
एप्रिलपासूनच कपाशी बियाणांची विक्री
ज्या शेतातील विहिरीत पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासूनच कपाशी बियाणे खरेदीला सुरुवात केली. बी-बियाणे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी सांगितले की, जिल्ह्यात कपाशीची १२ लाख पाकिटे विकली जातात. आजघडीपर्यंत ४० टक्के कपाशी बियाणे विक्री झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करूनही टाकली आहे. गेल्यावर्षी मक्याला कमी भाव मिळाल्याने यंदा कपाशीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अशीच मागणी राहिली तर कपाशी बियाणांच्या १६ लाख पाकिटांची विक्री होईल. बियाणे कंपन्यांनी जिल्ह्यात केलेल्या सर्व्हेनुसार मक्याचे क्षेत्र ३० टक्क्यांनी घटणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
कृषी विभागाचे नियोजन
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले. यात जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात घट होईल व मक्याचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत २ लाख ३,८०० हेक्टरपेक्षा अधिक मक्याचे सरासरी क्षेत्र आहे. मात्र, यंदा ३ लाख ५० हजार हेक्टरपर्यंत मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. बाजारात उलटी परिस्थिती दिसत असून, मक्यापेक्षा कपाशीच्या बियाणाची अधिक खरेदी होत आहे.
७१ हजार मे. टन खताचा पुरवठा
जिल्ह्यात खरीप हंगामात २ लाख ३१ हजार मे. टन खताची आवश्यकता भासणार आहे. त्यात जून महिन्यात १ लाख मे. टन खतपुरवठ्याचे नियोजन आहे.
आजघडीपर्यंत ७१ हजार २०० मे. टन खताचा पुरवठा झाला आहे. जिल्ह्यात खत व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आता पेरणीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. कृत्रिम टंचाई दाखवून कोणी जास्त किमतीत बियाणे किंवा खत विक्री करीत असेल, तर त्यांची माहिती कृषी विभागाला कळवा, असे आवाहन कृषी सहसंचालक जनार्दन जाधव यांनी केले आहे.

Web Title: Cotton plantation will be reduced due to Maize area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.