नगरसेवकाची विरुगिरी
By Admin | Updated: May 8, 2014 00:49 IST2014-05-08T00:47:32+5:302014-05-08T00:49:11+5:30
परभणी : हायमास्ट दिवे दुरुस्ती होत नसल्याने प्रभाग समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक सचिन देशमुख यांनी विजेच्या खांबावर चढून विरुगिरी करीत आपला रोष व्यक्त केला.

नगरसेवकाची विरुगिरी
परभणी : शहरातील देशमुख हॉटेल परिसरातील हायमास्ट दिवे आणि प्रभागातील पथदिवे दुरुस्ती होत नसल्याने प्रभाग समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक सचिन देशमुख यांनी विजेच्या खांबावर चढून विरुगिरी करीत आपला रोष व्यक्त केला. अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर दोन तासांनी देशमुख यांनी आपले आंदोलन मागे घेतले. शहरातील देशमुख हॉटेल चौकात हायमास्ट बसविलेला आहे. मागील काही दिवसांपासून हायमास्ट दिवे बंद पडलेत. वारंवार पाठपुरावा करुनही हे दिवे बसविले जात नसल्याने बुधवारी नगरसेवक सचिन देशमुख यांनी हायमास्ट दिव्यांच्या खांबावर चढून रोष व्यक्त केला. प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक असलेले सचिन देशमुख यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास विजेच्या खांबावर जावून आंदोलनाला प्रारंभ केला. भर उन्हात त्यांनी हे आंदोलन सुरु केल्याने सुरुवातीला येणार्या-जाणार्यांना काही लक्षात आले नाही. परंतु, नंतर महानगरपालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी देशमुख यांना खाली येण्याची विनंती केली. परंतु, जोपर्यंत हायमास्ट सुरु करीत नाहीत, तोपर्यंत खाली न येण्याचा पवित्रा देशमुख यांनी घेतला. जवळपास दोन तास हे आंदोलन चालल्यानंतर मनपाच्या अधिकार्यांनी हायमास्ट तत्काळ दुरुस्त केला जाईल व दिवे सुरु करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर सव्वा तीन वाजेच्या सुमारास देशमुख यांनी हे आंदोलन मागे घेतले. नगरसेवक देशमुख खांबावर चढल्याने या परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी) कर्तव्याची जाणीव करण्यासाठी आंदोलन महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आचारसंहितेचा बाऊ करीत लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधादेखील पुरवित नाहीत. मागील दीड महिन्यांपासून हा हायमास्ट बंद आहे. आचारसंहिता असली तरी नागरिकांना सुविधा पुरविणे हे अधिकारी आणि कर्मचार्यांचे कर्तव्य आहे. परंतु, ते पार पाडत नव्हते. त्यामुळे या अधिकारी- कर्मचार्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी आपण हे आंदोलन केल्याचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी आंदोलनानंतर सांगितले. काम सुरु आहे- मनपा या आंदोलनानंतर महानगरपालिकेचे प्रभारी यांत्रिकी अभियंता रफीक अहमद यांनी सांगितले, हायमास्ट दुरुस्तीचे काम खाजगी एजन्सीला दिले आहे. एजन्सीमार्फत हे काम सुरु आहे. दुरुस्तीसाठी दोन-तीन ठिकाणी लाकडी मचान बसविण्यात आल्या. परंतु, हायमास्टचे साहित्य उपलब्ध नाही. खाजगी कंत्राटदार ते दुसर्याकडून उपलब्ध करुन घेत आहेत. या आठवड्यात नादुरुस्त झालेले हायमास्ट दुरुस्त करण्यात येतील. राष्ट्रवादीला घरचा आहेर आंदोलनकर्ते सचिन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता असून सत्ताधारी नगरसेवकाने आंदोलन केल्याने राकाँला घरचाच आहेर मिळाला आहे.