coronavirus : औरंगाबादेत 'वर्क फ्रॉम होम' वाढले;‘आयटी’सह उद्योगांतील पाच हजार कर्मचारी करतात घरी बसून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:06 PM2020-03-21T12:06:02+5:302020-03-21T12:08:58+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकारात्मक पावले

coronavirus: work from home increased in Aurangabad; Five thousand employees in industries including 'IT' | coronavirus : औरंगाबादेत 'वर्क फ्रॉम होम' वाढले;‘आयटी’सह उद्योगांतील पाच हजार कर्मचारी करतात घरी बसून काम

coronavirus : औरंगाबादेत 'वर्क फ्रॉम होम' वाढले;‘आयटी’सह उद्योगांतील पाच हजार कर्मचारी करतात घरी बसून काम

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारपासून आणखी वाढ ५० टक्के कर्मचारी घरी बसून काम करतीलकामावर असलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी घरी बसतील

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादेतील उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढील किमान सात दिवस तरी ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी केल्यास धोका टळू शकतो. सध्या ‘आयटी’ आणि उद्योगांतील कार्यालयीन कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार कर्मचारी घरी बसून काम करीत असून, सोमवारपासून यामध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास औरंगाबादेतील उद्योजकांनी केला आहे. 

यासंदर्भात शहरातील काही प्रथितयश उद्योजकांसोबत चर्चा केली असता त्यांनी कंपन्यांतील उत्पादनापेक्षा कोरोनासारख्या महामारीला रोख लावण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीनुसार ५० टक्के कर्मचारी घरी बसून काम करतील, तर कामावर असलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी घरी बसतील, ही पद्धत आम्ही प्रभावीपणे राबवत आहोत. सध्या तरी केवळ ‘आयटी’ कंपन्या आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांमध्ये घरी बसून काम करण्याची पद्धत बऱ्यापैकी राबविण्यात येत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्लोबल एक्स्पर्ट या कंपनीचे प्रमुख प्रशांत देशपांडे यांनी सांगितले की, औरंगाबादेत लहान-मोठ्या मिळून ५० हून अधिक ‘आयटी’ कंपन्या आहेत. या कंपन्या आणि त्यांच्याशी निगडित सेवा देणाऱ्या उद्योगांमध्ये किमान ४ हजार कर्मचारी काम करीत आहेत. यापैकी २ हजार कर्मचारी सध्या घरी बसून काम करीत आहेत. अन्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘आयटी’ व अकाऊंट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही घरी बसून काम करण्यास सुरुवात केली आहे. 

उद्योजक मानसिंग पवार यांनी सांगितले की, औरंगाबादेत जवळपास ४ हजार उद्योग असून, त्यामध्ये अडीच ते तीन लाख कामगार काम करीत आहेत. यामध्ये कार्यालयीन कामकाज करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास १५ ते २० हजार एवढी आहे. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा पुणे- मुंबई- दिल्ली येथील प्रवास शंभर टक्के बंद केला आहे. सोशल डिस्टंस् राखण्यासाठी वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती उत्तम आहे. अनेक उद्योगांमध्ये ही कार्यपद्धत सुरू करण्यात आली आहे.

उद्योगांसमोरचे हे आव्हान
उद्योगपती ऋषी बागला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘वर्क फ्रॉम होम’ हे उद्योगांसमोर मोठे आव्हान असले, तरी ते पेलण्यासाठी सर्वच उद्योग तयार झाले आहेत. कोरोना विषाणूच्या महामारीला प्रतिबंध करण्यासाठी कमीत कमी कामगार- कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून कारखाने सुरू ठेवावे लागतील. तसाही या सात दिवसांत काही फरक पडणार नाही. आज शुक्रवार व उद्या शनिवारची उद्योगांना सुटीच असते. रविवारी पंतप्रधानांनी ‘जनता क र्फ्यू’ जाहीर केला आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने सोमवारपासून मोठ्या प्रमाणात होईल. सध्या काही उद्योगांनी ते सुरू केले आहे. सात दिवसांनंतर आढावा घेऊन पुढे काय करायचे त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल.

Web Title: coronavirus: work from home increased in Aurangabad; Five thousand employees in industries including 'IT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.