CoronaVirus : 'आमच्याकडे आता काही उरले नाही'; पैठणमधून ४० मजुर पायी निघाले मध्यप्रदेशकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:43 IST2020-04-13T19:40:47+5:302020-04-13T19:43:17+5:30
हाताला काम व पोटाला अन्न उरले नाही

CoronaVirus : 'आमच्याकडे आता काही उरले नाही'; पैठणमधून ४० मजुर पायी निघाले मध्यप्रदेशकडे
पैठण : हाताला काम व पोटासाठी अन्न उरले नाही म्हणून पैठण औद्योगिक वसाहतीतून पायी मध्यप्रदेशकडे निघालेल्या मजुरांना चितेगाव येथून पुन्हा परत फिरावे लागले आहे.धनगाव ते चितेगाव असा २० किमी पायी प्रवास केल्यानंतर चितेगाव येथून रस्त्याने जात असलेला ४० मजुरांंचा जथ्था पाहून एका दक्ष नागरिकांने या बाबत तहसील प्रशासनास माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने कारवाई करून तहसील प्रशासनाने मजुरांना धनगाव येथे परत आणले. आमच्या जवळ आता काही राहिले नाही, आम्हाला जाऊ द्या अशी विनवणी मजुर करत होते. तुमची सर्व व्यवस्था करू, तुम्ही परत फिरा असा विश्वास प्रशासनाने दिल्यानंतर मजुर परत येण्यास तयार झाले.
मध्यप्रदेश राज्यातील शेंदवा जिल्हा बडवाणी येथील ४० मजुर परिवारासह डिसेंबर २०१९ मध्ये पैठण तालुक्यातील धनगाव येथील भंडारी प्राईम कॉटन ईंडस्ट्रीज अँड ऑईल मील मध्ये कामासाठी आले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम बंद पडले व मजुरांना लॉकडाऊन परिस्थितीत मीलमध्येच रहावे लागले. लॉकडाऊन उठल्यानंतर आम्ही आमच्या गावाकडे जाणार होतो, परंतु, लॉकडाऊन वाढल्याने आम्ही खचलो आहोत, असे या मजुरांचा प्रमुख असलेल्या मोहन मेहता याने सांगितले. लॉकडाऊन वाढले, जवळचा पैसा थोडाच शिल्लक राहिला, कुणी मदत करेल ही आशा लोप पावली. शेवटी आम्ही दि १२ रोजी पाठिवर संसार घेऊन पायी मध्यप्रदेश मध्ये जाण्यास निघालो होतो असे मोहन मेहता यांनी सांगितले.
चितेगाव परिसरात रस्त्याने पायी जात असलेल्या महिला, पुरूष व बालके यांना पाहून चितेगावचे दक्ष नागरिक निलेश राजापुरे यांनी पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना या बाबत माहिती दिली. तहसीलदार शेळके यांनी चितेगावचे मंडळ अधिकारी संभाजी थोटे व तलाठी श्रीधर जमादार यांना तातडीने घटनास्थळी पाठवून सर्व मजुरांना परत आनण्याच्या सूचना दिल्या. मंडळ अधिकारी थोटे, तलाठी जमादार यांनी सर्व मजुरांना कोरोना बाबतीत माहिती देवून एका वाहनाने परत धनगाव येथील भंडारी मील मध्ये आणले. या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्या राज्यात आपल्या गावी परत जाऊ या आशेवर तग धरून बसलेल्या परप्रांतीय मजुरात लॉकडाऊन वाढल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे.
अडचण असल्यास मला कळवा
दरम्यान, मजुरांना परत आणल्या नंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मजुरांची भेट घेऊन काही अडचण असेल तर मला कळवा असे सांगत त्यांना स्वतः चा मोबाईल क्रमांक दिला. या मजुरांच्या अडचणी सोडविण्यात येतील असे तहसीलदार यांनी सांगितले.