coronavirus : गंभीर कोरोना रुग्ण पुण्याहून थेट औरंगाबादेत; राज्यातील अनेक शहरांतील रुग्णांवरही शहरात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 14:57 IST2021-05-05T14:55:42+5:302021-05-05T14:57:05+5:30
coronavirus: औरंगाबादेतील आरोग्य यंत्रणा ही केवळ जिल्ह्यातील रुग्णांवर नव्हे तर राज्यभरातील कोरोना रुग्णांवर उपचाराची जबाबदारी पार पडत आहे.

coronavirus : गंभीर कोरोना रुग्ण पुण्याहून थेट औरंगाबादेत; राज्यातील अनेक शहरांतील रुग्णांवरही शहरात उपचार
औरंगाबाद : राज्यातील अनेक शहरांत कोरोना रुग्णांना उपचारासाठी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यातुलनेत औरंगाबादची परिस्थिती अनेक पटीने चांगली आहे. त्यामुळेच मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांतील रुग्ण औरंगाबादेत धाव घेत आहेत. आता तर कोरोना रुग्ण थेट पुण्याहून शहरात दाखल होत असल्याची स्थिती पहायला मिळत आहे.
औरंगाबादेतील आरोग्य यंत्रणा ही केवळ जिल्ह्यातील रुग्णांवर नव्हे तर राज्यभरातील कोरोना रुग्णांवर उपचाराची जबाबदारी पार पडत आहे. घाटी, जिल्हा रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयांत मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील कोरोना रुग्ण भरती होत आहे. एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर रेफर केले जाते, तर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होईल, या आशेने काही जण उपचारासाठी औरंगाबादला येत आहेत. पण औरंगाबादेत अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या बहुतांश रुग्णांची प्रकृती गंभीर राहत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. शहरात अहमदनगरहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापुढे आता पुण्यातील रुग्णही शहरात दाखल होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. मुंबई पेक्षाही सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पुण्यात आढळून आले. रुग्णालयाने उपचार शक्य नसल्याचे म्हटल्याने रुग्णास पुण्याहून औरंगाबादेत दाखल केल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
रुग्णालय म्हणते, कुठेही घेऊन जा
पुण्यातील रुग्णालयाने आमच्याकडे उपचार होणार नाही, कुठेही घेऊन जा, असे सांगितले. त्यामुळे भावाला औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयातील आयसीयूत दाखल केले. इथे दोन दिवसांत त्याची प्रकृती सुधारली. आम्ही आशाच सोडून दिली होती, पण भाऊ सुखरुपपणे घरी परतला. डाॅक्टरांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.
- रेवती सोनार, रुग्णाची बहीण
गंभीर अवस्थेत दाखल
आमच्याकडे उपचार होत नाही, असे म्हटलेले पुण्याच्या रुग्णालयातील कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. गंभीर अवस्थेतील काहींची ऑक्सिजन पातळी ४० ते ५० होती. आतापर्यंत पुण्यातील ३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सध्या एका रुग्णावर उपचार सुरु आहे.
- डाॅ. उज्ज्वला दहिफळे
रुग्ण कुठलाही असला तरी उपचार
रुग्ण कोणत्याही जिल्ह्यातील असला तरी त्यास उपचारासाठी दाखल करून घेण्यास प्राधान्य दिले जाते. रेमडेसिविर लागत असेल तर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करता येईल. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहे.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक