coronavirus : कोणताही आजार नाही, वय कमी, तरीही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:47 IST2020-09-07T19:44:39+5:302020-09-07T19:47:04+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत १ ते ४० या वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या होती.

coronavirus : कोणताही आजार नाही, वय कमी, तरीही मृत्यू
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यामध्ये जून महिन्यापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांत ज्येष्ठ नागरिकांची आणि हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी होती; परंतु आता कमी वयात आणि कोणताही आजार नसतानाही रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत १ ते ४० या वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या होती. मार्च ते जून या तीन महिन्यांत ६० टक्के रुग्ण या वयोगटातील होते. मात्र, सर्वाधिक रुग्णसंख्या असूनही, या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी होते. यादरम्यान ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. कारण वयाच्या पन्नाशीनंतर आणि वृद्धापकाळात अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांमुळे कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती गंभीर होते. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने मृत्यू ओढवत असल्याची परिस्थिती दिसून आली.
कोरोनाचा ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात होते, पण ज्येष्ठांबरोबर आता कमी वयातील म्हणजे ५० वर्षांखालील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातही इतर कोणताही आजार नसतानाही रुग्णांची प्रकृती गंभीर होऊन मृत्यू ओढावत आहे. एक, दोघांपुरता हा प्रकार झालेला नसून, कमी वयात आणि कोणतेही आजार नसताना अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. मात्र, रोज होणाऱ्या मृत्यूमुळे शहरातील नागरिकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न
मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामीण भागांत सर्वेक्षणाचे काम चालू आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती यावर सर्व अवलंबून असते. कमी वयात मृत्यूचे प्रमाण सध्यातरी कमी आहे.
काही रुग्णांची स्थिती
१ सप्टेंबर रोजी दाखल के लेल्या हिमायतबागमधील २८ वर्षीय पुरुषाचा २ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या रुग्णास कोणतीही सहविकृती नव्हती. आसेगाव-गंगापूर येथील ३३ वर्षीय पुरुषाचाही २ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यालाही इतर कोणते आजार नव्हते. अशीच स्थिती ग्रामीण आणि शहरात अनेकांच्या बाबतीत पाहायला मिळाली.
ग्रामीण भागातील मृत्यूची परिस्थिती
वय रुग्णसंख्या
१ -१० १
११-२० ०
२१-३० ७
३१-४० १
४१-५० २१
५१-६० ३१
६१-७० ४२
७१-८० २६
८० वर्षांवरील ८
एकूण १३७