CoronaVirus : रेड झोनमधील औरंगाबादमध्ये लॉकडाऊनचा बोजवारा; प्रशासनाच्या दुर्लक्षाने वर्दळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:28 IST2020-04-20T14:08:11+5:302020-04-20T15:28:53+5:30
शहरात कोरोनाचे ३१ रुग्ण आहेत

CoronaVirus : रेड झोनमधील औरंगाबादमध्ये लॉकडाऊनचा बोजवारा; प्रशासनाच्या दुर्लक्षाने वर्दळ वाढली
औरंगाबाद : शहरात कोरोनाचे ३१ रुग्ण आहेत,यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीचे गांभीर्याने पालन होणे आवश्यक आहे. मात्र सोमवारी सकाळपासूनच शहरात नागरिक विविध कारणांनी बाहेर पडत असल्याने जालनारोडवर वर्दळ दिसून आली. शहराच्या अनेक भागात असेच चित्र दिसून येत असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे यावर कसलेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास सर्वजण लढत आहेत. शहरात कोरोनाचे आतापर्यंत ३१ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहर रेड झोनमध्ये असून अधिक खबरदारी घेणे अपेक्षित आहे. मात्र शहरात लॉकडाऊनचा पुरता बोजवारा उडाला असून नागरिक घराच्या बाहेर मोठ्याप्रमाणावर पडत आहेत. विविध कारणांनी नागरिक बाहेर आल्याने मुख्य रस्त्यावर येणे वर्दळ दिसून येत होती. विशेष म्हणजे यावेळी पोलीस किंवा कुठलीही शासकीय यंत्रणा वाढत जाणाऱ्या गर्दीला आवरत नव्हती. केवळ अत्यावश्यक सेवा उपलब्ध असल्या तरी नागरिक कोणत्या कारणांमुळे बाहेर पडत आहेत यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसून येत आहे.
धोका वाढू शकतो
शहरातील विविध १६ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांचा मुक्त वावर धोकादायक ठरू शकतो. यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन आणि संचारबंदीचे गांभीर्याने अंमलबजावणी करून अधिक कडक करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.