coronavirus : औरंगाबादमध्ये २० मे पर्यंत लॉकडाऊन जैसे थे; होणार कडक अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 19:31 IST2020-05-16T19:29:23+5:302020-05-16T19:31:11+5:30
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांचे सर्व प्रशासकीय यंत्रणेला आदेश

coronavirus : औरंगाबादमध्ये २० मे पर्यंत लॉकडाऊन जैसे थे; होणार कडक अंमलबजावणी
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये २० मे बुधवारपर्यंत १०० टक्के लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिले आहेत. या आदेशापूर्वी १७ मेपर्यंत १०० टक्के लॉकडाऊनचे आदेश होते.
शहरात पोलीस प्रशासनाकडून कंटेन्मेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कंटेन्न्मेंट झोनमधून नागरिकांचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कंटेन्मेंट झोनमध्ये होणारी ये जा बुधवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला त्यांनी दिल्या. नागरिकांनी सहकार्य करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्णय
विनाकारण नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे आयुक्त केंद्रेकर यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा आदेश त्यांनी १४ मे रोजी रात्री उशीरा जारी केले होते. तत्पूर्वी १७ मे पर्यंत सम-विषम तारखाना सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत असे लॉकडाऊन होते. अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सर्व बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.