CoronaVirus : अनधिकृत प्रवेशाच्या खुष्कीच्या मार्गाचा झाला उलगडा; डाव्या-उजव्या कालव्याची सर्व्हिस रोड चर खोदून केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 20:05 IST2020-04-18T20:01:16+5:302020-04-18T20:05:40+5:30
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांंनी तातडीने हे रस्ते बंद करण्याचे आदेश जायकवाडी प्रशासनास दिले होते.

CoronaVirus : अनधिकृत प्रवेशाच्या खुष्कीच्या मार्गाचा झाला उलगडा; डाव्या-उजव्या कालव्याची सर्व्हिस रोड चर खोदून केली बंद
पैठण : जायकवाडीच्या डावा व उजव्या कालव्याच्या सर्व्हिस रस्त्याद्वारे जालना व बीड जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात अनधिकृत वाहतूक सुरू होती. सदर रस्त्यावर आज चर खोदून वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणारे सर्व रस्ते सीमेवर बंद करण्यात आले आहेत. असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी जालना व बीड जिल्ह्यातील नागरिका कडून जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्याचा सर्व्हिस रोड पर्यायी रस्ता म्हणून वापर करण्यात येत असल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांंनी तातडीने हे रस्ते बंद करण्याचे आदेश जायकवाडी प्रशासनास दिले होते.
औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणारे सर्व रस्ते सीमेवर बंद करण्यात आले असून सीमेवर सीसीटीव्ही सह चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहे. या चेकपोस्ट वर कडक तपासणी होत असल्याने जालना बीड व अहमदनगर जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यात व पैठण तालुक्यात प्रवेश करण्यासाठी डाव्या व उजव्या कालव्याच्या सर्व्हिस रोडचा पर्यायी रस्ता म्हणून वापर वाढला होता. या बाबत पैठण तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे या बाबत तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कालव्याचे सर्व्हिस रोडवर दोन - दोन किलोमीटर अंतरावर चर खोदून बंद करावेत असे आदेश दिले.
आज जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, धरण अभियंता बुध्दभूषण दाभाडे, आजमेरा आदींनी डाव्या कालव्याच्या रस्त्यावर चारी क्रमांक १२ परिसरात चर खोदून रस्ता बंद केला. यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड येथून पैठण तालुक्यात येणारी वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान उजव्या कालव्याचा रस्ता बंद करून बीड व अहमदनगर जिल्ह्यातून होणारी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.