coronavirus : निडर योद्ध्याप्रमाणे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा कोरोनाविरुद्ध लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 07:05 PM2020-03-17T19:05:19+5:302020-03-17T19:06:31+5:30

कोरोना संशयित रुग्णांपासून, तर पॉझिटिव्ह रुग्णावर डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी कोणतीही भीती न बाळगता निष्ठेने  उपचार करीत आहेत.

coronavirus: Like a fearless warrior, doctors fight against Corona | coronavirus : निडर योद्ध्याप्रमाणे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा कोरोनाविरुद्ध लढा

coronavirus : निडर योद्ध्याप्रमाणे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा कोरोनाविरुद्ध लढा

googlenewsNext
ठळक मुद्दे डॉक्टर आणि प्रत्येक आरोग्य कर्मचारी २४ तास अलर्ट पॉझिटिव्ह रुग्णानंतरही डॉक्टर, कर्मचारी सकारात्मक

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या भयामुळे साध्या शिंकणाऱ्या व्यक्तीपासून अनेकजण दूर पळत आहे. मात्र, त्याच वेळी कोरोना संशयित रुग्णांपासून, तर पॉझिटिव्ह रुग्णावर डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी कोणतीही भीती न बाळगता निष्ठेने  उपचार करीत आहेत. निडर योद्ध्याप्रमाणे २४ तास अलर्ट राहून हे सर्वजण काम करीत आहेत.

कोरोना अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’ झाली आणि पाहता पाहता संशयितापाठोपाठ पॉझिटिव्ह रुग्णही समोर आला. घाटीत ११ मार्च रोजी पहिला संशयित दाखल झाला. तेव्हापासून डॉक्टर आणि प्रत्येक आरोग्य कर्मचारी २४ तास अलर्ट राहत आहे. पहिला रुग्ण निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हापासून घाटीत संशयित रुग्ण दाखल झालेला नाही; परंतु येथील कोरोना व्हायरस मदत केंद्र सध्या महत्त्वाची भूमिका निभावत आहे. कोणी पुण्यावरून, कोणी मुंबई, तर कोणी नागपूरवरून आल्याचे सांगत कोरोनाचा संशय व्यक्त करतात. अशांची तपासणी करून निदान करण्याचे काम डॉक्टर करीत आहेत कोणत्याही भीतीशिवाय.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. मोहन डोईबळे, डॉ. कैलास झिने, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. अविनाश लांब, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. ज्योती बजाज, डॉ. सुचेता जोशी, डॉ. विकास राठोड यांच्यासह ‘सीव्हीटीएस’ विभागाच्या इमारतीत साकारण्यात आलेल्या विशेष विभागातील स्टाफ नर्स, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी दक्ष राहून कर्तव्य बजावत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. सुनील गायकवाड, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. पद्मा बकाल, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. महेश लड्डा, डॉ.संतोष नाईकवाडे आणि रुग्णालयाचे पथक संशयित रुग्णांवर उपचाराची महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परदेशातून ग्रामीण भागात परतणाऱ्यांची तपासणी करण्यावर भर आहे. मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह मनपाचे आरोग्य कर्मचारीही सध्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या भागात सर्वेक्षणासह अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णानंतरही डॉक्टर, कर्मचारी सकारात्मक
रु ग्णालयात पॉझिटिव्ह रुग्ण आहे, हे माहीत असून डॉक्टर, कर्मचाऱ्यांत कोणतीही भीती नाही. खबरदारीसह सकारात्मक राहून प्रत्येक जण नियमित कामकाज करीत आहे, त्यांच्यात कोणत्याही प्रकारे भीतीचे वातावरण नाही, असे खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.


शांतचित्ताने कामकाज
कोरोना हे एक नवीन आव्हान आहे. ते आव्हान  यशस्वीपणे पार केले जाईल, असे वाटते. जनतेसह आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा ताणतणावाचा कालावधी आहे; परंतु प्रत्येक आरोग्य कर्मचारी शांतचित्ताने काम करून चांगली सेवा देत आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत दक्ष राहावे लागत आहे. 
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

एकत्रित जबाबदारी
कोरोनासंदर्भात सकाळपासून सायंकाळपर्यंत येणाऱ्या फोनचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकाचे समाधान करावे लागते. कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेसाठी प्रोत्साहन द्यावे लागते. या परिस्थितीत प्रत्येक कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. मनपा हद्दीत रुग्ण असूनही आम्हीही मदत करीत आहोत. कारण ही सर्वांची जबाबदारी आहे.
- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

खबरदारीवर भर
सध्या रुग्णालयात रुग्ण नाही; परंतु तरीही आम्ही खबरदारी म्हणून तयारी करीत आहोत. आवश्यक बाबींची पूर्तता करून घेत आहोत. २४ तास अलर्ट राहावे लागत आहे. प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. दिवसभरात आढावा बैठकांना जावे लागते. रुग्णालयातील स्थिती जाणून घ्यावी लागते.    
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय


कर्तव्याची ठरावीक वेळ नसते 
कर्तव्याची कोणतीही ठरावीक वेळ नसते. २४ तास दक्ष राहावे लागत आहे. रुग्णालयात काही सुविधा नसेल, तर त्या तात्काळ उपलब्ध करून घेण्याकडे लक्ष द्यावे लागत आहे. रुग्णालयात विनाकारण गर्दी होणार नाही,याकडे लक्ष देत आहे. दिवसभरातील बहुतांश वेळ रुग्णसेवेसाठी जात आहे. 
- डॉ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

Web Title: coronavirus: Like a fearless warrior, doctors fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.