CoronaVirus : सहनशिलतेचा अंत; डांबून ठेवलेले कामगार उद्रेकाच्या उबंरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 13:58 IST2020-04-18T13:48:16+5:302020-04-18T13:58:50+5:30

लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचा धीर सुटला आहे. या कर्मचाऱ्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होईल, असे वातावरण

CoronaVirus: End of Endurance; Depressed workers on the verge of an outbreak in Aurangabad | CoronaVirus : सहनशिलतेचा अंत; डांबून ठेवलेले कामगार उद्रेकाच्या उबंरठ्यावर

CoronaVirus : सहनशिलतेचा अंत; डांबून ठेवलेले कामगार उद्रेकाच्या उबंरठ्यावर

ठळक मुद्देखायला-प्यायला मिळते पण गावी जाण्याची ओढगावात तीन मुल उपाशी असताना आम्ही इंथ कस खात बसाव घरातला एकमेव कमावता इथं आडकून पडलोयदो दिन वे व्यवस्था करो वरना हम भाग जाएगे

- राम शिनगारे 
औरंगाबाद : शेकडो किलोमिटर चालत गावी जाणाऱ्या कामगारांना पोलिसांनी पकडून आणून शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ठेवले आहे. यास १५ दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर गावी जाण्याची परवानगी मिळेल, या आशेवर कर्मचारी सुरुवातीला होते. मात्र आता लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचा धीर सुटला आहे. या कर्मचाऱ्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होईल, असे वातावरण महापालिकेच्या शाळांमध्ये बनले असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.

 सिडको एन-७ येथील शाळेतील परिस्थिती धोकादायक बनली आहे. अनेक कर्मचारी जेवणावर बहिष्कार घालत आहेत. त्यांना समजावण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकारीही कामगारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निरुत्तर होत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांशी जास्तीत जास्त संवाद साधण्यात येत नाही. त्यांच्याशी बाहेरून कोणीही बोलण्यास आले की, पहिला प्रश्न आम्हाला गावी जाण्यासाठी केव्हा सोडणार? असा उपस्थित केला जात आहे. यामुळे त्याठिकाणी ड्युटीवर असलेले शिक्षक, पोलीस कर्मचारीही निरुत्तर होत आहेत. 

गावात तीन मुल  उपाशी असताना आम्ही इंथ कस खात बसाव  

एन- ७ येथील महापालिकेच्या शाळेत मागील १५ दिवसांपासून वास्तव्याला असणाऱ्या रत्नाबाई उगले यांच्याशी संवाद साधला. नगरहून आम्ही पायी आमच्या गावाकडं जात होतो. शेंद्रयापर्यंत पोहचलो असताना गोड बोलून पोलिसांनी आम्हाला याठिकाणी आणून ठेवले आहे. आम्ही एकुण सातजण आहोत. आम्हाला वाशिमला जायचे आहे. या शाळेत पोटभर खायला मिळत आहे. पण ते काय कामाचे आहे. माझी तीन लेकरं गावाकडे उपाशी  मरत आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळ इथं तोंडात घास घालु वाटत नाही. या सरकारानं आम्हाला घरी नेऊन सोडल नाही तरी चालते आम्ही आपलं पायी चालत जाऊ. आमच्यामुळं जर कोणाला कोरोना-बिरोना होण्याची भिती जर वाटत असेल तर आम्हाला आमच्या गावाच्या बाहेर शेतात ठेवा. त्याठिकाणी आम्ही राहू. पण इथं नको. इथं कितीबी खायला दिल तरी तोंडात घात जात नाही. लेकरांची सतत आठवण येते. त्यांना कोण खावू- पिवू घालणार? ही मोठी समस्या आमच्यापुढ असल्याचंही 
रत्नाबाई उगले यांनी सांगितले. तुम्हाला ३ मेपर्यंत थांबाव लागेल, अस विचारला असता, त्यांनी हे शक्य नाही. आम्ही इतक्या दिवस इथं राहूच शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.


घरातला एकमेव कमावता इथं आडकून पडलोय 

पुण्याहून पायी गावाकडं चालत जात होतो. औरंगाबादच्या पोलिसांनी रस्त्यावरून जाताना पकडले.  या शाळेत आणून ठेवले आहे. माझ गाव बुलढाणा जिल्हातील घरोड हे आहे. घरात पत्नी, पाच मुल आहेत. सगळी खाती तोंड असून, एकटाच कमावता पुरुष आहे. घरात धान्य, किराणा माल नाही. गावाकडून सारखा फोन येत आहे. यातच माझी पत्नी आणि तीन मुल आजारी असतात. त्यांची देखभाल करण्यासाठीही कोणी नाही. त्यामुळं मला जाऊन दिलं पाहिजे, अशी विनवनी शंकर इंगोले हे करत होते. माझ्या तालुक्याच्या प्रशासनानं माझ्या कुटुंबाकड लक्ष दिलं पाहिजे. त्याशिवाय जिवाला चैन पडणार नाही असंही ते सांगत होते. त्याच आम्ही काय गुन्हा केलाय का? गाड्या नव्हत्या म्हणून आपलं पायी जात होतो. त्यात कोणाच नुसकान काहीच नव्हतं. तरीही आम्हाला पकडून आणून ठेवलं. हे बरोबर नाही. बरं आणखी किती दिवस राहायचे, याच काहीच नक्की नाही. ज्यांना कुणाला हा रोग झालाय. त्यांना ठेवा की कितीबी दिवस. पण विनाकारणच आमची फजिती चालू केलीय, असंही शंकर इंगोले हे सांगत होते. 

दो दिन वे व्यवस्था करो वरना हम भाग जाएगे

 एन- ७ येथील महापालिकेच्या शाळेत मध्यप्रदेशसह इतर राज्यातील चालत जाणारे मजूरही ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संतापाला पारावार उरला नसल्याचे दिसून आले. ‘हमे यहाँ रहने का नही, दो दिन वे व्यवस्था करो वरना हम भाग जाएगे’ अशी भाषा हे कामगार बोलत आहेत. एकजण मुंबईहून मध्यप्रदेशला चालत जात होता. त्याला पकडून याठिकाणी आणण्यात आले. आणखी किती दिवस राहवे लागेल, याची काहीच माहिती देण्यात येत नाही. त्यामुळं आम्ही आता याठिकाणी कंटाळलो आहोत. येत्या तीन-चार दिवसात निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर नक्की उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असेही तो युवक बोलत होता. एकाच्या घरात भांडणे झाली आहेत. आई घरातुन निघून गेल्याचे फोनवर सांगत आहेत. माझ्या आईला मी शोधायला कसा जाऊ सवालही मध्यप्रदेशातला एक मजूर करत होता. येत्या दोनचार दिवसात शासनाने निर्णय घेतला पाहिजे, नाही घेतला तरी आम्हाला याठिकाणी आता अधिक काळ थांबवू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus: End of Endurance; Depressed workers on the verge of an outbreak in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.