coronavirus : नागरिक गस्ती पथकाला म्हणाले, ‘जाने दो साहब... कुछ नहीं होता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:36 IST2020-05-26T18:36:09+5:302020-05-26T18:36:09+5:30
सुरुवातीला सिल्कमिल कॉलनी परिसरातील नागरिकांनी पथकाला प्रतिसाद दिला नाही. यामध्ये विशेषत्वाने तरुणांचा सहभाग अधिक होता.

coronavirus : नागरिक गस्ती पथकाला म्हणाले, ‘जाने दो साहब... कुछ नहीं होता’
औरंगाबाद : सिल्कमिल कॉलनी परिसरात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गेलेल्या पथकाला नागरिकांनी ‘जाने दो साहब... कुछ नहीं होता’, असे म्हणत रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड व पथकाने नागरिकांमधील गैरसमज दूर करीत जागृती केली.
सुरुवातीला सिल्कमिल कॉलनी परिसरातील नागरिकांनी पथकाला प्रतिसाद दिला नाही. यामध्ये विशेषत्वाने तरुणांचा सहभाग अधिक होता. ‘जाने दो साहब... कुछ नहीं होता’, असे त्यांचे म्हणणे होते. दररोजचे गस्ती पथक या भागात भेट देत असून काहींचा विरोध अजूनही जाणवत आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करीत पथक कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती नागरिकांना देत आहे.
लोकांमध्ये कोरोना विषाणूपासून होणाऱ्या संसर्गाबाबत जागृती करण्यात पथकाला यश आल्याचे डॉ. फड यांनी सांगितले. सहसमन्वय अधिकारी म्हणून श्रीकांत देशपांडे, नोडल अधिकारी विजय महाजन, वैभव पाटील, अभय करमरकर, सुनील अत्रे, गस्त अधिकारी जी.व्ही. गाडेकर, एस.एच. देवरे, एस.एच. सोनवणे, डी.डी. सूर्यवंशी, एस.डब्ल्यू. सरकटे आदी सिल्कमिल कॉलनी परिसरात परिश्रम घेत आहेत.