Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊनच्या काळात कोणाचीही गय केली जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:57 IST2020-07-08T19:53:47+5:302020-07-08T19:57:43+5:30
लॉकडाऊन केवळ ९ दिवस आहे. मात्र, या कालावधीत संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.

Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊनच्या काळात कोणाचीही गय केली जाणार नाही
औरंगाबाद : शहरातील वाढत्या कोरोना साथीची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान राबविण्यात येणारे लॉकडाऊन अत्यंत कडक असेल. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस चांगलाच धडा शिकविण्याच्या तयारीत आहेत. यादृष्टीने पोलीस प्रशासनाचे संचारबंदीची रूपरेषा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पोलीस उपायुक्त मीना मकवाना म्हणाल्या की, लॉकडाऊन केवळ ९ दिवस आहे. मात्र, या कालावधीत संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. १० तारखेपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होईल. यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरात ३ हजार ५०० पोलीस आहेत. शहर पोलिसांच्या मदतीला सध्या राज्य राखीव दलाची एक कंपनी आहे. आणखी एका कंपनीची मागणी केली आहे. याशिवाय ३५० होमगार्ड जवान कार्यरत आहेत. ४५ पेक्षा कमी वयाच्या आणखी १०० होमगार्डची मागणी करण्यात आली. शहराच्या ६ सीमेवर पोलीस अधिकाऱ्याचे चेकपोस्ट असेल. शहरातील विविध चौक आणि संवेदनशील भाग, असे मिळून ३८ ठिकाणी फिक्स तपासणी पॉइंट असतील. तेथे नियमित नाकाबंदी केली जाईल. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
५०० पोलीस तैनात
कोरोनाबाधित क्षेत्रात सील केलेल्या ठिकाणी पोलीस मुख्यालयाचे सुमारे ५०० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. शिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याला दोन ते तीन, असे सुमारे १०० पोलीस नाकाबंदीसाठी संलग्न आहेत.
एसीपीची नियमित रात्रगस्त
शहरातील कोरोनाबाधित क्षेत्रात आणि फिक्स पॉइंट, तसेच शहराच्या सीमा असलेल्या ठिकाणी पोलीस हजर राहतात अथवा नाही हे पाहण्यासाठी वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे हे रोज रात्री १० ते २ वाजेपर्यंत गस्तीवर असतात.