Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊनच्या काळात शहरातील चेकपोस्टवरच होणार कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:51 IST2020-07-08T19:50:08+5:302020-07-08T19:51:54+5:30
चेकनाक्यावर प्रवाशांच्या लाळेचे नमुने घेऊन तो अहवाल आल्यानंतरच त्यानुसार निर्णय घेण्यात येईल

Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊनच्या काळात शहरातील चेकपोस्टवरच होणार कोरोना तपासणी
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात शहरातील नगर नाका, केम्ब्रिज हर्सूल इत्यादी टोलनाक्यांवर मनपातर्फे ४ बस मोबाईल पथकाद्वारे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून कोरोनाचे निदान केले जाईल, अशी माहिती मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, चेकनाक्यावर प्रवाशांच्या लाळेचे नमुने घेऊन तो अहवाल आल्यानंतरच त्यानुसार नागरिकांना घरी पाठवायचे की क्वॉरंटाईन करायचे, हे ठरविले जाईल. संचारबंदीच्या काळात तपासण्या वाढविण्यात येणार असून, संशयित रुग्णांना तातडीने लगेच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल, तसेच विद्यापीठातील प्रयोगशाळेत नमुने तपासणीस सुरुवात झाली असून, आज मनपातर्फे ५० नमुने पाठविण्यात आले असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
सरकारी कार्यालये सुरू राहणार
संचारबंदीत सरकारी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील, तसेच अग्निशमन, पाणी, आरोग्य, सफाई यासह आवश्यक सेवांमधील सर्व सेवा सुरू राहतील. शहर, जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी पोलीस परवानगी (पास) बंधनकारक असेल.
१० हजार अॅन्टिजन्सी टेस्टिंंग कीट
जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, शासनाकडून कोरोना संशयित रुग्ण तपासणीसाठी अॅन्टिजन्सी टेस्टिंगसाठी कीट वाटप करण्यात आले असून, औरंगाबाद जिल्ह्याला १० हजार कीट मिळणार आहेत. मनपाला आणि तालुक्याला कीट वितरित करून नियमानुसार त्याचा वापर करण्यात येईल, तसेच शासनाकडे अॅन्टिबॉडी टेस्टिंगसाठी प्रशासनाने परवानगी मागितली आहे.