Coronavirus In Aurangabad : कोरोनाने लक्षणे बदली; औरंगाबादमधील नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:45 IST2020-07-06T19:36:11+5:302020-07-06T19:45:57+5:30
कोरोनाने लक्षणे बदलल्यामुळेच औरंगाबादपेक्षा धुळे आणि जळगाव येथील मृत्यूदराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते आहे.

Coronavirus In Aurangabad : कोरोनाने लक्षणे बदली; औरंगाबादमधील नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला
औरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असून विषाणूची लक्षणे बदलू लागली आहेत. जळगाव आणि धुळ्यात लागण झालेल्या रुग्णांच्या विषाणूचे नमुने घातक असून औरंगाबादमधील नमुनेदेखील पुणे येथील व्हायरॉलॉजी लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाची लागण संपर्कातून होत आहे. त्यामुळे लागण झालेल्या रुग्णांच्या स्वॅबच्या नमुन्यांचे विश्लेषण करून ठरेल की नेमका तो विषाणू इतर राज्यांप्रमाणे उपद्रवी आहे की, दुबई, चीन किंवा इतर देशांतील रुग्णांना झाल्यासारखा आहे. कोरोनाने लक्षणे बदलल्यामुळेच औरंगाबादपेक्षा धुळे आणि जळगाव येथील मृत्यूदराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते आहे. नांदेड आणि औरंगाबादमधील कोरोना नेमका कुठल्या देशाशी साधर्म्य साधणारा आहे, याची माहिती पुढे येण्यासाठी पुण्यातील लॅबमधून तपासणी होणे गरजेचे असल्यामुळे येथील विषाणूचे नमुने लॅबला पाठविले आहेत. कोरोनाची साधर्म्यता लक्षात आल्यानंतर उपचारासाठी आणखी पावले उचलले जातील, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले.
सुरुवातीला कोविडबाबत कमी माहिती होती. परिस्थितीतून सर्व शिकता आले आहे. एका विशिष्ट वयाच्या नागरी लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. २७६ मृत्यूचे विश्लेषण केले आहे. वय आणि इतर आजार असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. शेवटच्या टप्प्यातच रुग्ण उपचारासाठी समोर येत असल्यामुळे शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी मेडिसिन आणि आयसीयू विभागातील उपचार पद्धतीची माहिती यावेळी दिली.
तीन दिवसांत मृत्यूंचे प्रमाण जास्त
पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उपचारास संधी मिळत नाही. फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचारास प्रतिसाद मिळत नाही. १९.५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा औरंगाबादचा दर आहे. जे.जे. हॉस्पिटल आणि कस्तुरबा रुग्णालयापेक्षा अधिक स्वॅब टेस्ट येथे होत आहेत. ३५ हजार ३६७ टेस्ट आजवर केल्या असून ५ मशिन्स त्यासाठी कार्यरत असल्याचा दावा डॉ. येळीकर यांनी केला.