CoronaVirus In Aurangabad : काॅन्टॅक्ट ट्रेसिंग घसरली; चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:36 IST2021-05-06T12:35:24+5:302021-05-06T12:36:52+5:30
CoronaVirus In Aurangabad : जिल्ह्यात बाधितांचा आकडा घसरला असला तरी पाॅझिटिव्हिटी दर वाढलेलाच आहे

CoronaVirus In Aurangabad : काॅन्टॅक्ट ट्रेसिंग घसरली; चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली !
औरंगाबाद : जिल्ह्यात महापालिका क्षेत्राचा ३० टक्क्यांपेक्षा अधिक तर ग्रामीण भागात २६ टक्क्यांवर गेलेला पाॅझिटिव्हिटी रेट सध्या कमी झाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील हा दर १६ टक्क्यांपर्यंत पोहोचला. बाधित रुग्णसंख्या घटताना दिसतेय. मात्र, चाचण्यांची संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे.
चाचण्या वाढवून पाॅझिटिव्ह रुग्ण अधिक प्रमाणात शोधणे, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक करण्यावर भर असल्याची स्ट्रॅटेजी जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आली होती. मात्र, आठवडाभर उंचावलेली चाचणी संख्या आता पुन्हा घटत आहे, तर शहरातील चाचण्याही पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचे दररोजच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट अद्याप १६ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. तो फारसा दिलासादायक नसला तरी आणखी तपासणी वाढविण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत असताना ग्रामीण भागात चाचणीला अनुत्सुकता दिसून येत आहे.
अँटिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआरचे अधिक अहवाल पॉझिटिव्ह
अँटिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह येत असल्याचे पहायला मिळत आहे. १५ एप्रिलला आरटीपीसीआर पाॅझिटिव्हिटीचे १६.६५, तर अँटिजेन पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण ९.८७ टक्के होते. १ मे रोजी आरटीपीसीआरमध्ये २५.४७ बाधित, तर अँटिजेन केल्यानंतर ८.३३ टक्के बाधित आढळले.
ग्रामीण भागात टेस्टिंग कमीच
प्रत्येक आरोग्य केंद्रावर किमान १०० तपासणी व्हावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले. कमी तपासणी असलेल्या १३ केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना समक्ष बोलवून खडसावले. मात्र, ग्रामीण भागातून तपासणीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळू न शकल्याने ५० आरोग्य केंद्र आणि ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून पाच हजारांपेक्षा अधिक तपासण्या एकदाही होऊ शकल्या नसल्याने आकडेवारीवरून समोर आले आहे. ग्रामीण भागात दररोज साडेतीन ते साडेचार हजार चाचण्या होत आहेत. ४५५५च्या वर ग्रामीण भागात चाचण्या झाल्या नाहीत. यात साडेचारशे ते साडेनऊशेपर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
तारीख - एकूण चाचण्या -रुग्ण -पॉझिटिव्हिटी दर
१ एप्रिल - ६९९५ -१४८१ -२१.१७
८ एप्रिल - ८७६४ -१३६२ -१५.५४
१५ एप्रिल -९६०३ -१३२९ -१३.२४
२१ एप्रिल -९३८५ -१२०७ -१२.८६
२८ एप्रिल -७७३५ १३१४ १६.९९
१ मे -६९५० -११३४ -१६.३२
२ मे -६११५ -८३५ -१३.६५
३ मे - ७८३२ -८०१ -१०.२२
४ मे - ७४२० -९८१ -१३.२२