coronavirus : कन्नडमध्ये 'ब्रेक द चैन'ला हरताळ फासणारी ७ दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 16:29 IST2021-05-05T16:28:11+5:302021-05-05T16:29:41+5:30
coronavirus : शहरात पोलीस पथकाने आदेशाचा भंग करणाऱ्या जवळपास ४९ दुकानांचे फोटो काढले आहेत. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

coronavirus : कन्नडमध्ये 'ब्रेक द चैन'ला हरताळ फासणारी ७ दुकाने सील
कन्नड - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु 'ब्रेक द चैन' या अंतर्गत लागू असलेल्या निर्बंधांना काही दुकानदारांनी हरताळ फसल्याचे दिसून आले आहे. शासनाच्या आदेशाला न जुमानता छुप्या पध्दतीने दुकाने सुरु ठेवलेली अशी ७ दुकाने आज सील करण्यात आली आहेत.
राज्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चैन' या अंतर्गत नियमावली लागू करण्यात आली आहे. यानुसार अटी व शर्थीसह किराणा दुकान, दुध डेअरी आदी अत्यावश्यक सेवेतील दुकाने /आस्थापना, कृषी साहीत्य बी –बियाणेंची दुकाने, मेडीकल हे सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक दुकानदार निर्बंधांचे उल्लंघन करून दुकाने उघडत आहेत. यामुळे उपविभागीय अधिकारी जर्नाधन विधाते , तहसिलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, प्रभारी मुख्याधिकारी शेख हारून यांच्या सनियंत्रणात तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन शहर, नगरपरीषद यांच्या संयुक्त पथकाने अशा दुकानदारांवर कारवाई सुरु केली आहे.
पथकाने केलेल्या पाहणी शहरातील ७ दुकाने आदेशाचा भंग करून उघड असल्याचे दिसून आले. या सातही दुकानांना पथकाने पुढील आदेश येईपर्यंत सील केले आहे. यामध्ये आकाशदीप कापड दुकान, जॉन डिअर ट्रॅक्टर एजन्सी, श्रीकृष्ण हार्डवेअर यासह दोन हेअर सलुन व दोन गॅरेज यांचा समावेश आहे. यावेळी त्यांच्याकडून ३ लक्ष ५० हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
ही कारवाई अव्वल कारकुन सत्यजीत आव्हाड, मंडळ अधिकारी आबा पाटील, पी एस आय भुषण सोनार, तहसील कार्यालयाचे राहुल खंदारे, कुणाल दाभाडे, तलाठी आशिष सुरपाम, सुनिल कोठावदे, एरंडे, नगर परीषदेचे निकम, कदम, नारायण कनगरे यांच्या पथकाने केली. दरम्यान, शहरात पोलीस पथकाने आदेशाचा भंग करणाऱ्या जवळपास ४९ दुकानांचे फोटो काढले आहेत. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.