coronavirus : दुसऱ्या लाटेत एचआरसीटीचा बोलबाला; १५ कोटींची उलाढाल, जवळपास ५० टक्के रुग्णांचे सीटी स्कॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 12:36 IST2021-05-05T12:33:35+5:302021-05-05T12:36:57+5:30
गेल्यावर्षीच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एचआरसीटीचा बोलबाला सुरू असल्याचे दिसते आहे.

coronavirus : दुसऱ्या लाटेत एचआरसीटीचा बोलबाला; १५ कोटींची उलाढाल, जवळपास ५० टक्के रुग्णांचे सीटी स्कॅन
- विकास राऊत
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हायरिसोलेशन कॉम्प्युटेड टोमोग्राफीला (एचआरसीटी ) विशेष महत्त्व दिले जात असून, यातून मागील तीन महिन्यात शहरात तब्बल १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एचआरसीटीचा बोलबाला सुरू असल्याचे दिसते आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनेदेखील सीटी स्कॅनपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. असे असताना एचआरसीटीच्या स्कोअरवरून माइल्ड, मॉड्युलर, सिव्हिअर असे रुग्णांचे विश्लेषण केले जात असून, या एचआरसीटीसाठी मागील तीन महिन्यांत शहरात ८० हजारांपैकी अंदाजे ४० हजार रुग्णांचे जवळपास १५ कोटी रुपये खर्च झाल्याचे दिसते आहे.
एका स्कॅनसाठी १६, ३२, ६४ स्लाइडच्या तुलनेत दर आकारला जातो, परंतु शासनाने १६ स्लाइडच्या स्कॅनिंगसाठी २५०० रुपये दर ठरवून दिला आहे. एप्रिलमध्ये ४४ हजार, तर मार्च आणि फेब्रुवारीत सुमारे ३६ हजार रुग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडले. ८० हजार रुग्णांपैकी ४० हजार रुग्णांनी घाटी, मेल्ट्रॉन, मिनी घाटी, कोविड केअर सेंटर आणि होम आयसोलेशनमार्फत उपचार घेतल्याच्या अंदाजानुसार उर्वरित ४० हजार रुग्णांनी खासगी व धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये उपचार घेतले. त्या रुग्णांवार एचआरसीटीच्या आधारेच उपचार करण्यात आले.
कोरोनाच्या अनुषंगाने ४५०० बेड्स क्षमतेपैकी १२५० शासकीय हॉस्पिटलमधील बेड्सची संख्या आहे. शासकीय हॉस्पिटल्समध्ये गरज असेल तरच एचआरसीटी केले जात आहे. तीन महिन्यांत सात ते आठ हजार रुग्णांचे एचआरसीटी शासकीय हॉस्पिटल्समध्ये करण्यात आले. काही रुग्णांचे डिजिटल एक्स-रेवर कोरोनाचे निदान केले. मात्र खासगी हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढण्याचा मुद्दाच दुसऱ्या लाटेत कालबाह्य ठरतो आहे.
औरंगाबादमधील हॉस्पिटल्सवर एक नजर
एकूण हॉस्पिटल्स - ६५०, शहरातील हॉस्पिटल- ४००, मोठे हॉस्पिटल- ८०, धर्मदाय हॉस्पिटल- १५, कोविड हॉस्पिटल- ११५
टेस्ट निगेटिव्ह आली तर अनेकांची एचआरसीटी
कोरोनाची आरटीपीसीआर, अॅण्टिजन टेस्ट निगेटिव्ह आली तरी एचआरसीटी करण्याचा सल्ला अनेकांना दिला जात आहे, तर पालिकेने निर्धारित केलेल्या टेस्ट सेंटरवरून पॉझिटिव्ह टेस्ट आली की, थेट एचआरसीटी करून घेण्यास सांगण्यात येते.
शहरात १० सीटी स्कॅन केंद्र आहेत
शहरात १० रेडिओलॉजी सेंटर्स असून, खासगी हॉस्पिटलमध्ये स्वत: सेंटर आहे. मोठ्या धर्मदाय हॉस्पिटलसह कोविड हॉस्पिटल्समध्येदेखील एचआरसीटी करणाऱ्या स्कॅनिंग मशीनची सुविधा आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटल्समध्ये टेस्ट करण्यापूर्वीच नागरिक लक्षणांच्या अनुषंगाने तपासणीसाठी गेले की एचआरसीटी करण्यास सांगण्यात येत आहे.
एचआरसीटी प्रत्येकाची करण्याची गरज नाही
मागील तीन महिन्यांत ८० हजारांच्या आसपास रुग्ण कोरोना आढळले. त्यातील ५० टक्के रुग्णांची एचआरसीटी स्कॅन केलेच असतील. गेले वर्ष एक्स-रे वर कोरोनाचे निदान करून उपचार केले. परंतु दुसऱ्या लाटेत एचआरसीटीला इतके महत्त्व का दिले जात आहे, हे कळण्यास मार्ग नाही. एचआरसीटी प्रत्येक रुग्णांसाठी गरजेचे नाही. शासनाने नेमून दिलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कमदेखील यासाठी घेतली जात आहे. निश्चितपणे शहरात यातून १२ ते १५ कोटींची उलाढाल झालीच असेल.
- डॉ. सुंदरराव कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक