coronavirus : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत १३ विद्युत, गॅसदाहिनी; स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 17:53 IST2021-05-05T17:48:32+5:302021-05-05T17:53:11+5:30
coronavirus : नांदेडमध्ये ३, लातूरमध्ये २, उदगीरमध्ये १, हिंगोली १, जालन्यात १, औरंगाबादमध्ये ४ आणि बीडमध्ये १ अशा १३ विद्युत व गॅसदाहिन्या होतील.

coronavirus : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत १३ विद्युत, गॅसदाहिनी; स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा थांबणार
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे दररोज शंभराहून अधिक मृत्यू होत असल्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. मृतदेहाची अवहेलना होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्युतदाहिनी सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उस्मानाबाद, परभणी वगळता उर्वरित औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये महिनाभरात दाहिन्या कार्यान्वित होणार आहेत.
नांदेडमध्ये ३, लातूरमध्ये २, उदगीरमध्ये १, हिंगोली १, जालन्यात १, औरंगाबादमध्ये ४ आणि बीडमध्ये १ अशा १३ विद्युत व गॅसदाहिन्या होतील. परभणी आणि उस्मानाबादसाठी लवकरच निर्णय होणार आहे. बीडमध्ये तांत्रिक अडचण आहे, ती पूर्ण होईल. बाकीच्या जिल्ह्यात लवकरच काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. एका रुग्णवाहिकेत एकावर एक रचून अनेक मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले होते. या प्रकारानंतर प्रशासकीय यंत्रणेने विद्युत, गॅसदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीला मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त जगदीश मिनीयार, औरंगाबाद फर्स्टचे प्रीतीश चटर्जी, मसिआचे अभय हंचनाळ, सीएमआयएचे सतीश लोणीकर, सीआयआय रमण अजगांवकर उपस्थित होते. वर्षभरापासून कोरोना महामारी सुरू असून, चार महिन्यांपासून दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे. या लाटेत रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, विभागात दररोज १०० ते १५० बाधितांचा मृत्यू होत आहे. औरंगाबाद, नांदेडसारख्या जिल्ह्यांत दिवसाला २५ ते ३० रुग्ण दगावत आहेत.
स्मशानभूमीत सगळे कुटुंब राबते
कोरोनाने दगावलेल्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे थेट स्मशानभूमीत नेला जातो. बऱ्याच ठिकाणी कुटुंबातील सदस्य अंत्यविधीला नसतात. स्मशानभूमीत मृतदेह येत असल्याने जागेअभावी अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. शिवाय स्मशानजोगींचे पूर्ण कुटुंब दिवसरात्र काम करीत आहे. महिला, मुलेदेखील मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी परिश्रम घेतात. या सगळ्या परिस्थितीवर गॅस आणि विद्युतदाहिनी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.