Corona Virus : सुखद ! घरी राहून अख्या कुटुंबाने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 15:12 IST2021-04-28T15:07:06+5:302021-04-28T15:12:50+5:30
सिडकोतील शिवदत्त हौसिंग सोसायटीमधील रहिवासी मंदार कुलकर्णी व त्यांची पत्नी पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. मागील वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी औरंगाबादमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

Corona Virus : सुखद ! घरी राहून अख्या कुटुंबाने केली कोरोनावर मात
औरंगाबाद : माझी आई वगळता वडील, मला व पत्नी आणि चिमुकल्या मुलीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर आम्ही हादरून गेलो होतो. पण डॉक्टरचा सल्ला, पौष्टिक आहार, जास्तीत जास्त आराम, घरातील स्वछता याकडे अधिक लक्ष दिले. उल्लेखनीय म्हणजे शेजारी व नातेवाइकांनी दिलेल्या सकारात्मक प्रोत्साहनाच्या बळावर कोरोनावर मात केली, असे आत्मविश्वासाने सांगणारे सिडकोतील रहिवासी मंदार कुलकर्णी व त्यांचे कुटुंब एकटे नसून अशा शेकडो लोकांनी घरात विलगीकरणात राहून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली.
सिडकोतील शिवदत्त हौसिंग सोसायटीमधील रहिवासी मंदार कुलकर्णी व त्यांची पत्नी पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. मागील वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी औरंगाबादमध्ये येण्याचा निर्णय घेतला. कंपनीने परवानगी दिल्यानंतर ते मागील वर्षभरापासून ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. घरात वडील सुधाकर कुलकर्णी (७२), आई उषा कुलकर्णी, मंदार व त्यांची पत्नी अंबिका आणि अवघ्या अडीच वर्षाची ध्रिती असे ५ जण राहतात. त्यांच्या वडिलांना श्वास घेण्याचा त्रास अचानक सुरू झाला. वय लक्षात घेता त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घरातील सर्वांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात त्यांची आई उषा कुलकर्णी वगळता बाकी सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
बंगला मोठा असल्याने त्यांनी डॉक्टरच्या परवानगीने घरी विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. आई निगेटिव्ह आल्याने ती स्वतंत्र रूममध्ये होती. पाठीमागील ३ खोल्यात मंदार, त्याची पत्नी व मुलगी विलगीकरणात होते. एक दिवसाआड डॉक्टर व्हिडीओ कॉलिंगवर संवाद साधत होते. प्रकृतीची माहिती घेत व सल्ला देत होते. आई निगेटिव्ह आल्याने स्वयंपाकघरातच तयार होत असे. बाहेरून डब्बा मागविण्याची गरज पडली नाही. शाकाहाराशी कोणतीही तडजोड न करता पौष्टिक जेवणावर भर दिला. त्यात किराणा सामान आणण्यापासून ते सकारात्मक प्रोत्साहन देण्यापर्यंत शेजारी व नातेवाइकांनी सहकार्य केले. या बळावरच आम्ही कोरोनामुक्त झालो, असे मंदार यांनी सांगितले.
फुगे फुगविण्यावर भर
सुरुवातीला श्वास घेण्याचा त्रास झाला, पण दोन दिवसांनंतर त्रास कमी झाला. घरी आल्यानंतर अशक्तपणा, थकवा जाणवू लागला. त्यावेळेस दोन दिवस ऑक्सिजनची गरज पडली. या काळात अनेक फुगे फुगवले. या प्रकारामुळे टाईमपास झाला व श्वास घेण्यासाठी लागणारा त्रास कमी झाला.
- सुधाकर कुलकर्णी
सकारात्मक दृष्टिकोन ठेवला
आम्हाला कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. असा सकारात्मक विचार आम्ही सतत केला. त्यादृष्टीने धार्मिक गीत, मराठी, हिंदी चित्रपटातील रोमँटिक गाणी ऐकली. विशेष म्हणजे या काळात कोरोनाच्या कोणताही बातम्या बघितल्या नाहीत. जेवणासाठी युज अँड थ्रो ताट, वाट्या, ग्लास वापरले.
- मंदार कुलकर्णी
आहार, आराम यावर जास्त भर
आम्ही आमच्या आहारात फळांचा समावेश वाढविला तसेच सुकामेव्याचे सेवनही करत होतो. जेवणात तेल, तिखट, मिठाचे प्रमाण कमी केले. दिवसातून तीनदा गरम पाण्याची वाफ घेतली. रात्री झोपताना हळद टाकून दूध प्यायले. तसेच जास्तीत जास्त आराम केला व घराच्या स्वछतेवर अधिक भर दिला.
- अंबिका कुलकर्णी
आईने खूप काळजी घेतली
आईने माझी खूप काळजी घेतली. मला त्रास होऊ नये म्हणून ती रात्री स्वतःला मास्क लावून झोपत होती. आजी आमचा स्वयंपाक बनवत होती. डॉक्टर व्हिडीओ कॉलिंगवर माझ्याशी बोलत होते. मला जास्त त्रास झाला नाही.
- ध्रिती कुलकर्णी