Corona Virus : कोविड वॉर्डात टीव्ही ठेवा, भिंतीवर कार्टून रंगवा; तिसऱ्या संभाव्य लाटेतील बालरुग्णांच्या दृष्टीने तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 18:11 IST2021-05-15T18:10:06+5:302021-05-15T18:11:45+5:30
Corona Virus : कोरोना संसर्गाचा विषाणू रूप बदलत असून आता तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. या लाटेत शून्य ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना हा विषाणू लक्ष्य करू शकतो.

Corona Virus : कोविड वॉर्डात टीव्ही ठेवा, भिंतीवर कार्टून रंगवा; तिसऱ्या संभाव्य लाटेतील बालरुग्णांच्या दृष्टीने तयारी
औरंगाबाद : कोविडची तिसरी लाट लहान मुलांना अधिक बाधित करण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. उपचारादरम्यान मुले लवकर कंटाळतात. त्यासाठी कोविड सेंटरमध्ये वॉल पेटिंग, कार्टूनसाठी टीव्हीची सोय करावी लागेल. पालकांना मुलांसोबत राहण्याची व्यवस्था करावी लागेल. विभागात प्रत्येक जिल्ह्यात आयसीयू, डीसीएच, डीसीएचसीची व्यवस्था उभारावी लागेल. १२ ते १५ टक्के बाल कोरोना रुग्णांत २ टक्के मुलांना ऑक्सिजनची गरज सध्या आहे. अशा सूचना बालरोगतज्ज्ञांकडून बैठकीत समोर आल्या.
कोरोना संसर्गाचा विषाणू रूप बदलत असून आता तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. या लाटेत शून्य ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना हा विषाणू लक्ष्य करू शकतो. या बालकोविडचा सामना करण्यासाठी मराठवाड्यासमोर अनेक आव्हाने असून येत्या दोन महिन्यांत मनुष्यबळ, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, औषधी पुरवठा आदी अत्यावश्यक बाबी तयार राहतील, या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बालरोगतज्ज्ञांना सूचना दिल्या.
पहिल्या दोन लाटेत आरोग्य यंत्रणेने परिश्रमाने काम केले आहे, त्याप्रमाणे तिसऱ्या लाटेतूनही हीच यंत्रणा विभागाला बाहेर काढील असा विश्वास व्यक्त करीत केंद्रेकर म्हणाले, विद्यमान स्टाफला प्रशिक्षित करावे लागेल. मराठवाड्यात किती बालके कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रभावीखाली येऊ शकतात. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, इन्फ्रास्ट्रक्चर किती लागेल, कोणती इंजेक्शन्स, औषधी लागेल. याबाबत वर्कआऊट तातडीने करण्यात यावे. औरंगाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात सध्या १६० व्हेंटिलेटर्स आहेत. इतर जिल्ह्यांतखील तयारी करावी लागेल. प्रसूती विभाग आणि नवजात शिशुविभाग एकत्रित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
घाटी बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. खंडेलवाल, डॉ. शोएब, डॉ.पाठक, डॉ. अभय जैन, डॉ. खडके, डॉ. जाधव, डॉ. विनाेद इंगळे, डॉ. कुलकर्णी आदींकडून आयुक्तांनी बालकोविड आणि कोरोनाची तिसरी लाट याबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील. यातील अडचणी काय आहेत, हे समजून घेतले. डॉ. देशमुख यांच्यावर सर्वंकष माहिती संकलित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. मनपाच्या ६ डॉक्टर्सना घाटीमध्ये प्रशिक्षणही दिल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या असलेले व्हेंटिलेटर अपग्रेड करावे लागतील
सध्या उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर बालकोविड उपचारांत वापरता येणे शक्य नाही. त्यासाठी व्हेंटिलेटर सॉफ्टवेअर अपग्रेड करावे लागेल. ३० बेडस असलेल्या हॉस्पिटल्सना स्वत: ऑक्सिजन निर्मिती करावी लागणार आहे. तशा सूचना लवकरच देण्यात येणार आहेत.