corona virus : अरे, इंजेक्शन देता का कुणी इंजेक्शन ? रेमडेसिविरच्या तुटवड्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 19:08 IST2021-04-28T19:07:44+5:302021-04-28T19:08:50+5:30
वापर केलेल्या इंजेक्शन व रुग्णांची माहिती विहित नमुन्यात डॉक्टरांनी प्रशासनास देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

corona virus : अरे, इंजेक्शन देता का कुणी इंजेक्शन ? रेमडेसिविरच्या तुटवड्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ
औरंगाबाद : डॉक्टर्सनी दिलेले प्रिस्क्रिप्शन घेऊन रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. इंजेक्शन देता का कुणी इंजेक्शन, अशी भावनिक साद नातेवाईक अधिकाऱ्यांना घालत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
३९ हजार इंजेक्शनची मागणी केलेली आहे. त्यातून १ हजार इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे. मनपाने १० हजार मागितली होती. जिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यांत ३ हजार इंजेक्शनची मागणी केली होती. यातील १ हजार इंजेक्शन मिळाली, तर पालिकेला पुरवठा झालेला नाही. त्यामुळे शासनाकडून साठाच उपलब्ध न झाल्याने रुग्ण नातेवाइकांना परतावे लागले. इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्समधील डॉक्टर्स इंजेक्शनसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून देत हात वर करतात. त्यामुळे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करून इंजेक्शनची मागणी करीत आहेत. इंजेक्शनसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर रुग्णांचे नातेवाईक ठाण मांडत आहेत. साठा उपलब्ध न झाल्याने इंजेक्शन मिळण्यास विलंब होत असल्याचे अन्न व औषधी विभागाचे अधिकारी राजगोपाल बजाज यांनी नागरिकांना सांगितले. संतप्त नातेवाइकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. साठा उपलब्ध झाल्यास रुग्णालयाला इंजेक्शन्स पुरविण्यात येतील. दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, मंगळवारी रात्री इंजेक्शनचा पुरवठा होणार आहे. बुधवारी इंजेक्शन हॉस्पिटलच्या मागणीनुसार देणे शक्य होईल.
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष
गंभीर रुग्णांनाच इंजेक्शन दिले जावे, डॉक्टर्सने रुग्ण किती गंभीर हे आहे, पाहूनच इंजेक्शन द्यावे, अशा सूचना रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या होत्या. असे असले तरी सोमवारी, मंगळवारी नातेवाइकांनी कार्यालयात इंजेक्शनसाठी गर्दी केली होती. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन गंभीर रुग्णांनाच द्यावे. सरसकट सर्व रुग्णांसाठी त्याचा वापर करू नये. वापर केलेल्या इंजेक्शन व रुग्णांची माहिती विहित नमुन्यात डॉक्टरांनी प्रशासनास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनावश्यक रेमडेसिविरचा वापर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा देऊनही काही फरक पडलेला नसल्याचे दिसत आहे.