आरोग्य व्यवस्थेत वाढ; जिल्ह्यात २५ व्हेंटिलेटर व ४५ ऑक्सिजन यंत्रांची पडणार भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 14:31 IST2021-04-08T14:30:43+5:302021-04-08T14:31:28+5:30
corona virus कोरोना काळातील गांभीर्य लक्षात घेऊन फंडातून या दोन्ही संस्थांनी जिल्हा प्रशासनाला २ कोटी १३ लाख रुपये किमतीचे हे साहित्य देऊ केले आहे.

आरोग्य व्यवस्थेत वाढ; जिल्ह्यात २५ व्हेंटिलेटर व ४५ ऑक्सिजन यंत्रांची पडणार भर
औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था, पुणे आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, औरंगाबादशी बुधवारी एक सामंजस्य करार केला. या करारामुळे जिल्ह्यात २५ व्हेंटिलेटर व ४५ ऑक्सिजन सिस्टीमची भर पडणार आहे.
कोरोना काळातील गांभीर्य लक्षात घेऊन फंडातून या दोन्ही संस्थांनी जिल्हा प्रशासनाला २ कोटी १३ लाख रुपये किमतीचे हे साहित्य देऊ केले आहे. यात एक कोटी ६८ लाख रुपये किमतीचे २५ व्हेंटिलेटर आणि ४५ लाख रुपये किमतीच्या ४५ ऑक्सिजन सिस्टीमचा समावेश आहे.
या सामंजस्य करारावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जानकीदेवी ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नकाशा वर्मा यांनी सह्या केल्या. हे साहित्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयासाठी वापरण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.