'आधी अॅडव्हान्स भरा, मगच उपचार'; रुग्ण दाखल झाल्यानंतर २४ तासात भरावी लागते रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 12:21 IST2021-04-07T12:19:16+5:302021-04-07T12:21:21+5:30
corona virus in Aurangabad दररोज दीड हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

'आधी अॅडव्हान्स भरा, मगच उपचार'; रुग्ण दाखल झाल्यानंतर २४ तासात भरावी लागते रक्कम
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शासकीय रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. अनेक खासगी रुग्णालये रुग्ण दाखल होताच रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यास प्राधान्य देतात. परंतु काही खासगी रुग्णालये पैसे भरल्याशिवाय रुग्णास भरती करून घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच बहुतांश रुग्णालयांत २४ तासात डिपाॅझिटची रक्कम भरण्यास सांगितली जाते. त्यामुळे नातेवाईकांना पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करावी लागते.
खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी ठेवण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यासाठी आकारण्यात येणारे दरही निश्चित केले आहेत. उर्वरित २० टक्के खाटा अन्य रुग्णांसाठी आणि जे कोरोना रुग्ण खासगी सुविधा घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजारांवर गेली आहे. दररोज दीड हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशावेळी आयसीयु बेड नाही, व्हेंटिलेटर नाही यासह दाखल करून घेण्याआधीच आणि उपचार सुरू करण्याआधीच अनेक रुग्णालये पैसे भरण्यास सांगत असल्याची ओरड होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शासकीय दर कठीणच
खासगी रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्डसाठी रोज ४ हजार रुपये, आयसोलेशन आयसीयु विदाऊट व्हेंटिलेटरसाठी रोज ७ हजार ५०० आणि आयसोलेशन आयसीयु विथ व्हेंटिलेटरसाठी रोज ९ हजार रुपये शुल्क आहे. त्याशिवाय महागडी औषधी, तपासण्या, पीपीई कीटचा खर्च वेगळा आहे. ८० टक्के खाटांसाठी हा दर असल्याचे सांगण्यात आले.
रुग्ण आल्यानंतर आधी उपचार
औषधे ही रुग्णालयाची नसतात. अशा गोष्टींसाठी डिपाॅझिट घ्यावे लागते. परंतु डिपाझिट भरले नाही तर अॅडमिशन दिले जाणार नाही, असा प्रकार कोणत्याही रुग्णालयात होत नाही. त्यासाठी २४ तासांची वेळ दिली जाते. रुग्ण आल्यानंतर आधी उपचार करून रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यास प्राधान्य दिले जाते. अनेकांकडे विमा असतो, विम्याची मंजुरी येईपर्यंत तोपर्यंतच्या खर्चासाठी रक्कम घ्यावी लागते.
- डॉ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असाेसिएशन
खासगी रुग्णालयांचे दर डोळे पांढरे करणारे
ज्यांना वाॅर्डात राहायचे नसते, स्वतंत्र रूममध्ये थांबायचे असते, अशा रुग्णांसाठी वेगळे दर आकारण्यात येत आहेत. स्वतंत्र कक्षात ऑक्सिजन बेडसाठी ५ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते, तर दोन रुग्णांच्या शेअरिंग रूमसाठी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये मोजावे लागतात.
विमा असूनही रोखसाठी त्रास
एका खासगी रुग्णालयात नातेवाईकाला भरती केले. विमा होता. त्यामुळे कॅशलेस उपचार मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु रुग्णालयाने पैसे भरण्यास सांगितले. त्यामुळे ऐनवेळी पैसे जमा करावे लागले. कॅशलेस उपचार म्हटले, तर खऱ्याअर्थाने कॅशलेस उपचार मिळाले पाहिजेत. त्यात सुधारणा होण्यासाठी रुग्णालयांनीही पुढाकार घेतला पाहिजे, असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.