मोठा दिलासा ! ऑक्सिजनसाठी आर. एल. स्टील कंपनीचे जिल्हा प्रशासनाकडून अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 13:42 IST2021-04-16T13:39:11+5:302021-04-16T13:42:02+5:30
corona virus अधिग्रहीत केलेला उत्पादक ऑक्सिजन प्लांट स्थळावरून शहरातील अथवा जिल्हयातील कोणत्याही हॉस्पिटल, वितरक यांना विनाविलंब ऑक्सिजनचा पुरवठा करेल.

मोठा दिलासा ! ऑक्सिजनसाठी आर. एल. स्टील कंपनीचे जिल्हा प्रशासनाकडून अधिग्रहण
औरंगाबाद : जिल्ह्यातील रुग्णालये, वितरकांच्या ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन पैठण तालुक्यातील चितेगाव येथील मे. आर. एल. स्टील कंपनी यांना तत्काळ ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी काढले आहेत.
दरम्यान, अधिग्रहीत केलेला उत्पादक ऑक्सिजन प्लांट स्थळावरून शहरातील अथवा जिल्हयातील कोणत्याही हॉस्पिटल, वितरक यांना विनाविलंब ऑक्सिजनचा पुरवठा करेल. या कामात कोणताही निष्काळजीपणा अथवा दुर्लक्ष होणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी बजावले आहे. पथकातील सनियंत्रण अधिकारी म्हणून प्रादेशिक पर्यटन महामंडळाचे उपसंचालक श्रीमंत हारकर व सहआयुक्त, औषधे अन्न व औषध प्रशासन, औरंगाबाद यांच्याशी समन्वय ठेवून वेळोवेळी अहवाल सादर करतील.
मागणी वाढली...
कोविडबाधित रुग्णांना व अशा रुग्णांवर उपचार करणारे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर यांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लागत आहे. मार्च महिन्यात वाढलेली ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता, भविष्यात औरंगाबाद जिल्ह्यात व औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ऑक्सिजन (जम्बो सिलिंडरच्या स्वरुपात) आकस्मिक आवश्यकतेप्रमाणे तत्काळ उपलब्ध होणे अनिवार्य आहे. कोविड - १९ प्रथम लाटेवेळी व मार्च २०२१मध्ये काहीवेळा पुरवठ्यापेक्षा ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे निकडीची परिस्थिती उद्भवली होती. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनचा आकस्मिक साठा २४ तास उपलब्ध असणे आवश्यक आहे.
पथक नियुक्त...
ऑक्सिजन उत्पादकांनी जम्बो सिलिंडरचा वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार व जिल्ह्यातील कोविड रुग्णालये, वितरकांच्या ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन तत्काळ पुरवठा करावा, यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मनोज तलवारे, जि. द. जाधव, शी. गो. देशमुख, डी. डी. महालकर, बी. डी. राठोड यांचा या पथकात समावेश आहे.