Corona Virus In Aurangabad : धक्कादायक ! जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच कोरोना संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 12:25 IST2020-03-31T12:20:41+5:302020-03-31T12:25:21+5:30
डॉक्टरसह ११ संशयितांच्या लाळेचा नमुना घेतला तपासणीसाठी

Corona Virus In Aurangabad : धक्कादायक ! जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच कोरोना संशयित
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कान, नाक, घसा तद्ज असलेले डॉक्टरच कोरोनाच्या संशयाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याची धक्कादायक बाब सोमवारी समोर आली. त्यांच्यासह ११ संशयितांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित , 'ओपीडी' तील रुग्णांची तपासणी, उपचारात सदर डॉक्टर महत्वाची भूमिका निभावत होते.
तीन दिवसांपूर्वी ते रुग्णालयातून लाळेचे नमुने घेऊन पुण्याला गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांना अचानक ताप आला आणि सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. ताप अधिक असल्याने त्यांना आयसोलेशन वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या लाळेचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी दिली. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा रुग्णालयात सोमवारी दिवसभरात १३५ जणांची तपासणी करण्यात आली. यात ७८ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तर ७ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले असून , ५ संशयित रुग्णालयात दाखल असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली. घाटीत ३६ जणांची तपासणी घाटी रुग्णालयात ३६ जणांची तपासणी करण्यात आली. यातील ४ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. घाटीत ११ रुग्ण दाखल आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
श्रीलंकेचे दाम्पत्य गेले कुठे?
जिल्हा शल्यचिकित्सका सोमवारी दुपारी पोलिसांचा एक फोन आला.श्रीलंकेचे दाम्पत्य पकडले असून तपासणीसाठी रुग्णालयात आणत आहेत, अशी माहिती देण्यात आली. मात्र हे दाम्पत्य सायंकाळी उशीरापर्यतरुग्णालयात आले नाही, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.