corona virus : प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी; औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:21 IST2021-05-19T19:21:27+5:302021-05-19T19:21:41+5:30
corona virus : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज चार हजारांपेक्षा अधिक नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे.

corona virus : प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी; औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांवर
औरंगाबाद : मार्चच्या सुरुवातीला शहरात १०० पैकी ३२ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत होते. त्यामुळे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ३२ टक्क्यांपर्यंत गेला होता. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त तपासण्या, रुग्णांवर उपचार आणि कठोर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे आता अडीच महिन्यांनंतर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अवघ्या पाच टक्क्यांवर आला आहे.
शहरात काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज चार हजारांपेक्षा अधिक नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी शहरात १७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. शहराची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. १ जूनपर्यंत शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० ते ५० वर येईल, अशी शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर राज्य शासनाकडून लावण्यात आलेले कडक निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येतील, अशी अपेक्षा नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे.