corona vaccine : कोरोना लसींचा स्टॉक संपला तर मोहीम बंद पडते, १ मेनंतर काय होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 18:11 IST2021-04-27T18:08:10+5:302021-04-27T18:11:57+5:30
सध्याच महापालिकेच्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसभर लांबलचक रांगा लागत आहेत. वाढलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

corona vaccine : कोरोना लसींचा स्टॉक संपला तर मोहीम बंद पडते, १ मेनंतर काय होणार ?
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधासाठी लसीशिवाय पर्याय नाही, हे आता लोकांनाही कळून चुकले आहे. प्रारंभी लस घेण्यासाठी घाबरणाऱ्या नागरिकांनी आता लसीकरण केंद्रासमोर रांगा लावायला सुरुवात केली आहे. मागणी जास्त आणि शासनाकडून लसीचा पुरवठा कमी होत आहे. चार ते पाच दिवस लसीकरण मोहीम राबवून बंद करावी लागते. १ मेनंतर परिस्थिती आणखी विदारक होण्याची शक्यता आहे.
शहरात सध्या ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक नागरिकाला लस देण्यात येत आहे. १ मेनंतर १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच महापालिकेच्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसभर लांबलचक रांगा लागत आहेत. वाढलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेकडील लस साठा शनिवारी संपला होता. राज्य शासनाने रविवारी रात्री महापालिकेला फक्त २५ हजार डोस उपलब्ध करून दिले. सोमवारी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. गुरुवारी किंवा शुक्रवारपर्यंत पुरेल एवढाच साठा आहे. त्यानंतर पुन्हा लसीकरण मोहीम बंद करून नवीन साठा येण्याची वाट बघावी लागेल. तीन महिन्यांपासून असाच खेळ सुरू आहे.
१ मेनंतरचे नियोजन
शहरी भागात १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांची संख्या जवळपास तीन ते चार लाख असण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ पेक्षा पुढील प्रत्येक नागरिकाला लस देताना अनेक ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी टाळण्यासाठी महापालिकेला लसीकरण केंद्रे वाढवावी लागतील. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.
१० टक्के नागरिकांना दिली लस
शहराची लोकसंख्या सध्या सोळा ते सतरा लाख गृहीत धरण्यात येते. मागील तीन महिन्यांत महापालिकेने दोन लाखांहून अधिक नागरिकांना लस दिली आहे. १० टक्के नागरिकांना आतापर्यंत लस मिळाली आहे. शहरातील प्रत्येक वाॅर्डात लसीकरण मोहीम फक्त औरंगाबाद महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. असा उपक्रम इतर ठिकाणी नाही. सध्या शहरात लसीची प्रचंड मागणी वाढली आहे. जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा शासनाकडून होत नाही. त्यामुळे लसीकरण मोहिमेला अधूनमधून ब्रेक द्यावा लागत आहे.
अशी आहे आकडेवारी :
१४६ लसीकरण केंद्र सुरू, १४६ लसीकरण केंद्र शहरात
७,००० नागरिकांना दररोज लस, १०,००० नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट