कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:02 IST2021-06-24T04:02:01+5:302021-06-24T04:02:01+5:30

-- औरंगाबाद : कोरोना लसीकरणानंतर अनेकजण तातडीने केंद्राबाहेर पडतात. पण, असे करणे धोक्याचे असते. लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास ...

Corona vaccination can be expensive to rush home! | कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

--

औरंगाबाद : कोरोना लसीकरणानंतर अनेकजण तातडीने केंद्राबाहेर पडतात. पण, असे करणे धोक्याचे असते. लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास तरी केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. अन्यथा थंडी वाजून येणे, ताप वाढणे, रक्तदाब कमी जास्त होणे, रिॲक्शन येणे आदी त्रास उद्भवू शकतात. डाॅक्टरांच्या निगराणीत लसीकरण केंद्रावरच अर्धा तास थांबल्यास तत्काळ उपचार शक्य होतात; मात्र लस घेऊन तत्काळ रवाना झाल्यास केलेली घाई महागात पडू शकते.

शहरात शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रात ७८ तर ३ खासगी रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. तर ग्रामीण भागात १४ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, ५० प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या ठिकाणी लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला १८ ते ४४ वयोगटासाठी निवडक ठिकाणी केंद्रे होती. आता १८ वर्षांवरील सर्वांसाठी एकच केंद्र असून गर्दी होऊ नये व लसींच्या उपलब्धतेनुसार गटांच्या लसीकरणाचे आयोजन आरोग्य विभागाकडून केले जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले. आतापर्यंत सर्व गटांचे पहिला आणि दुसरा डोस मिळून ६ लाख ९० हजार ५१२ लस डोस देण्यात आले. त्यात फक्त साडेतीनशेहून अधिक जणांना किरकोळ त्रास जाणवल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

लसीकरणासाठी रांगेत तासनतास उभे राहिलेली मंडळी लस घेतल्यावर तत्काळ घरी जाण्याची घाई करतात. लसीकरण केंद्रावर बसण्याची व्यवस्था केलेली असताना अशी घाई करणे योग्य नसल्याचे लसीकरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास होतोय का, याबाबतची निरीक्षणे केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी नोंदवत असतात. त्यामुळे काही त्रास उद्भवल्यास तत्काळ उपचारही केले जातात. लस घेतल्यावर काहींना अंगदुखी, थोडा ताप, रक्तदाब वाढणे किंवा कमी होण्याची लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे सर्वांनाच आढळत नाहीत; मात्र तरीही काळजी घेणे गरजेचे आहे.

--

आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण -६,९०,५१२

पहिला डोस -५,४६,९४८

दुसरा डोस -१,४३,५६४

एकूण लसीकरण केंद्र -१४५

१८ ते ४४ वयोगटासाठी केंद्र -१४५

---

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

--

लस घेतल्यावर कोणताही त्रास झाल्यास तेथील आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी त्याचे निरीक्षण नोंदवतात. लसीमुळे होणाऱ्या रिॲक्शनचे उपचार तिथे उपलब्ध असतात. त्यामुळे लस घेतल्यावर किमान अर्धा तास केंद्रावर थांबणे आवश्यक आहे.

--

लस हेच औषध

--

लसीकरणानंतर त्रास झाल्याच्या काही तक्रारी असल्या तरी कोरोनावर लस हेच औषध आहे. महागड्यातल्या महागड्या औषधांचा वापर कोरोनाच्या उपचारात झाला; मात्र कोरोना बरा होईल असे औषध अद्याप झालेले नाही. लस हे संजीवनीचे काम करते. लस घेतल्यावर कोरोना झाला तरी त्याची तीव्रता लस न घेतलेल्या व्यक्तीपेक्षा कमी असल्याचे आतापर्यंतच्या पाहणीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे लसीकरणाची प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची ठरते.

--- लस घेतल्यावर केंद्रावर अर्धा तास थांबणे आवश्यक आहे. काही त्रास झाल्यास तेथे रिॲक्शनचे उपचार करण्याची व्यवस्था असते. त्याशिवाय इतर उपचार, मनाने उपचार केल्यास अडचणीचे ठरु शकते. नागरिकांनी लसीकरण उपलब्ध केंद्रावर न घाबरता स्वयंस्फूर्तीने लस घ्यावी. तेच कोरोना प्रतिबंधाचे एकमेव अस्त्र आहे.

-डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Corona vaccination can be expensive to rush home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.