कोरोनामुळे कळले ‘आरोग्य हीच संपत्ती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:04 IST2021-04-07T04:04:32+5:302021-04-07T04:04:32+5:30
औरंगाबाद : ‘हिवाळाला आला की, ‘व्यायाम’, ‘आपल्याला काही होत नाही’, असा विचार कोरोनापूर्वी पहायला मिळत असे; परंतु कोरोना महामारीने ...

कोरोनामुळे कळले ‘आरोग्य हीच संपत्ती’
औरंगाबाद : ‘हिवाळाला आला की, ‘व्यायाम’, ‘आपल्याला काही होत नाही’, असा विचार कोरोनापूर्वी पहायला मिळत असे; परंतु कोरोना महामारीने ‘आरोग्य हीच संपत्ती’ ही बाब सर्वसामान्यांत खऱ्या अर्थाने रुजली. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य व्यवस्थेत सुविधा वाढीवर भर दिला जात आहे. त्यासोबत प्रत्येक नागरिक आरोग्यासाठी ठरावीक रकमेची गुंतवणूक करीत आहे. आरोग्य विम्याचे प्रमाणही दुपटीने वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा या दिनाचे घोषवाक्य ‘अधिक चांगले, आरोग्यपूर्ण जग निर्माण करूया’ हे आहे. औरंगाबादेत मराठवाड्याचे टर्शरी केअर सेंटर, आधारवड म्हणून ओळख असलेले घाटी रुग्णालय आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाची ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३ उपजिल्हा, ११ ग्रामीण रुग्णालये आहेत. जिल्हा रुग्णालय, मनपाची आरोग्य केंद्रे, छावणी रुग्णालयदेखील आहे. आरोग्य हा अधिकार असल्याचे म्हटले जाते; परंतु आरोग्य व्यवस्थाच आजारी असल्याने हा अधिकार मिळण्यासाठी मोठ्या यातना सर्वसामान्यांना सहन कराव्या लागतात. कोरोना महामारीने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अखेर पाऊल पडले. शासकीय यंत्रणेत सुधारणा होत आहे. त्यामुळे किमान यापुढे शासकीय यंत्रणेत अधिक चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांत आरोग्य, आहार आणि स्वच्छतेचे महत्त्व वाढले.
----
विम्याचे प्रमाण वाढले
आरोग्य विमा हा आधी खर्चीक प्रकार वाटत असे. त्यातून काही परतावा मिळत नाही, अशी भावना वाढत होती; परंतु आता विम्याकडे कल वाढला आहे. पूर्वी आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण ७ टक्के होते. हे प्रमाण आता २० टक्क्यांवर गेले आहे.
-विलास देशमुख, आर्थिक सल्लागार
-----
मनुष्यबळही महत्त्वपूर्ण
कोरोनाच्या काळात डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. रुग्णालयात खाटा वाढल्या; परंतु या वाढीव खाटांच्या तुलनेत मनुष्यबळ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे डाॅक्टर, परिचारिकांची नियुक्ती करण्यावर भर दिला जात आहे.
-डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
----
नवीन उपचार पद्धती
कोरोनासाठी नवीन उपचार पद्धती वापरावी लागली. हे एकप्रकारे आव्हानच होते. शिवाय ऑक्सिजन व्यवस्था, आयसीयू, नवीन वाॅर्ड अशा बाबींवर गुंतवणूक झाली. ही गुंतवणूक निश्चितच भविष्यासाठीही उपयोगी ठरेल.
- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
---
आगामी काळातही फायदा
कोरोनापूर्वी महापालिकेचे व्हेंटिलेटरही नव्हते. मेल्ट्राॅनमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर आहे. मेल्ट्राॅन आगामी काळात संसर्गजन्य आजार रुग्णालय म्हणून मराठवाड्यात नावारूपाला येईल. कोरोनामुळे झालेल्या आरोग्य सुविधांचा आगामी काळातही फायदा होईल. नागरिकांतही आरोग्याविषयी जनजागृती वाढली आहे.
-डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी