ऑक्सिजन मास्क काढून फेकत रुग्णालयातून कोरोनाबाधित पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:01 IST2021-04-08T19:01:08+5:302021-04-08T19:01:28+5:30
सकाळी त्यांची पत्नी विचारपूस करण्यासाठी घाटीत गेली. तेव्हा तुमच्या रुग्णाने घाटीतून पलायन केल्याचे त्यांना सांगण्यात आले.

ऑक्सिजन मास्क काढून फेकत रुग्णालयातून कोरोनाबाधित पळाला
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन इमारतीमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित ४५ वर्षीय रुग्णाने पलायन केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली.
चितेगाव येथील ४५ वर्षीय कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन लावला. मात्र, ऑक्सिजन मास्क ते सतत काढून फेकत. यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांचे हातपाय बांधून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवले. ही बाब डॉक्टरांनी नातेवाइकांना फोन करून कळविली.
गुरुवारी सकाळी त्यांची पत्नी विचारपूस करण्यासाठी घाटीत गेली. तेव्हा तुमच्या रुग्णाने घाटीतून पलायन केल्याचे त्यांना सांगण्यात आले. ही बाब पोलिसांना कळविण्यासही सांगितले. यामुळे रुग्णाच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, रुग्ण घाटीतून थेट चितेगाव येथील घरी गेल्याचे समोर आले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गावात आल्याचे कळताच गावकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचे नातेवाइकांना सांगितले. मात्र सायंकाळपर्यंत रुग्ण घाटीत परतला नव्हता. याप्रकरणी घाटी प्रशासनाने बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. जागोजागी सुरक्षारक्षक असताना कोविड पॉझिटिव्ह रुग्ण वॉर्डातून पळून जातो कसा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.