कोरोनामुळे उद्योगांवर अनिश्चिततेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:52+5:302020-12-17T04:26:52+5:30

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर उद्योग पूर्वपदावर आले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या उद्योगांनी तब्बल ११० टक्के क्षमतेने उत्पादन काढले. असे असले ...

Corona causes uncertainty in the industry | कोरोनामुळे उद्योगांवर अनिश्चिततेचे सावट

कोरोनामुळे उद्योगांवर अनिश्चिततेचे सावट

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर उद्योग पूर्वपदावर आले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या उद्योगांनी तब्बल ११० टक्के क्षमतेने उत्पादन काढले. असे असले तरी उद्योग क्षेत्रात अजूनही कोरोनाची भीती कायम आहे. भविष्यात कोरोनाची आणखी एखादी लाट आली आणि बाजारपेठा प्रभावित झाल्या तर त्याचा उद्योगांवर पुन्हा गंभीर परिणाम होऊ शकतो, अशा अनिश्चिततेपोटी उत्पादन क्षमता विस्तारासाठी गुंतवणूक करण्याबाबत उद्योजकांनी आखडता हात घेतला आहे.

उद्योगांपुढे कुशल कामगारांची समस्या आहे; पण लॉकडाऊनमध्ये गावी निघून गेलेले कामगार परतले नाहीत. त्यामुळे उद्योगांवर परिणाम होत आहे, आता ही समस्या तेवढी राहिलेली नाही. लॉकडाऊनच्या काळात उद्योगांची विस्कटलेली घडी आता पूर्वपदावर आली आहे. पूर्वीप्रमाणे तीन शिफ्टमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू झालेली आहे. दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्योगांनी ११० टक्के एवढ्या क्षमतेने उत्पादन घेतले.

दिवाळीच्या दिवसांत उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली असते. काही उत्पादने बाजारात पोहोचलेली असतात. त्यामुळे जसजसा नाताळ (ख्रिस्मस) सण जवळ येतो. तसे उद्योगांनी उत्पादन क्षमता कमी केलेली असते. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा उत्पादन क्षमता झेप घेते, हा उद्योगांचा आतापर्यंतचा कल कायम आहे.

मात्र, उद्योगांमध्ये कोरोनाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. उद्योगांच्या विस्तारासाठी गुंतवणूक करण्याची त्यांची मानसिकता नाही. उत्पादन वाढीसाठी नवीन मशिनरी खरेदी करावी लागेल. त्यासाठी कर्ज काढावे लागेल. विस्तारासाठी पाच-सहा महिन्यांचा कालावधी लागतो, हा धोका पत्करण्यास सध्या तरी ते तयार नाहीत.

चौकट....

सेवा उद्योगांत प्रचंड वाढ

यासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांचे म्हणणे आहे की, एकीकडे लॉकडाऊनमुळे उद्योगांची आर्थिक घडी विस्कटली होती. आता ते पूर्वपदावर आले आहेत; पण ही भीती अजूनही कायम आहे. त्यामुळे आता उद्योगांची उत्पादन विस्तारासाठी गुंतवणूक करण्याची मानसिकता नाही. असे असले तरी याच काळात सेवा क्षेत्रामध्ये गत वर्षाच्या तुलनेत स्टार्टअप, लहान-लहान उद्योगांची प्रचंड नोंदणी झालेली आहे. साधारणपणे जानेवारी ते डिसेंबरदरम्यान, दरवर्षी राज्यात २० हजार नवीन उद्योगांची नोंद होत असते. ती यावर्षी ३५ हजारांपर्यंत पोहोचली आहे.

Web Title: Corona causes uncertainty in the industry