कोरोनामुळे विवाहसोहळ्यांचे वाजले तीन-तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:06 IST2021-04-23T04:06:28+5:302021-04-23T04:06:28+5:30
एकेकाळी लग्न हा इतका धांदलीचा आणि आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असायचा की, घाईच्या कोणत्याही गोष्टीला लगीनघाईची उपमा दिली जायची. मात्र, ...

कोरोनामुळे विवाहसोहळ्यांचे वाजले तीन-तेरा
एकेकाळी लग्न हा इतका धांदलीचा आणि आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असायचा की, घाईच्या कोणत्याही गोष्टीला लगीनघाईची उपमा दिली जायची. मात्र, कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम आल्याने लग्नातील वऱ्हाडी मंडळींची संख्या मर्यादित झाली. त्यामुळे साहजिकच मंगल कार्य ठरलेल्या लग्नसोहळ्याचे पूर्ण स्वरूपच बदलून गेले आहे. सध्या असलेल्या नियम व अटींमुळे शाही विवाहसोहळे लुप्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. मुंडावळ्यापेक्षा चांगल्या आणि देखण्या मास्कचा नवरदेव आणि नवरीला साज चढू लागला आहे. एकेकाळी होणाऱ्या शाही विवाहसोहळ्यांना आता चांगलीच मर्यादा आली. कित्येक एकर क्षेत्रावर भव्य शामियाने उभारून पार पडणारे शाही विवाहसोहळे आता आपापल्या घराच्या आवारात किंवा शेतामध्ये पार पडू लागले आहेत. एखाद्याची श्रीमंती मोजायची झाली तर त्याच्या मुलाच्या अथवा मुलीच्या विवाह सोहळ्यात मोजली जायची. ती पद्धतच आता बदलून गेली आहे. कोणाचा विवाह कधी आणि कोठे पार पडला, हे आता ग्रामदेवतेच्या दर्शनाला वधू-वर आल्यावरच समजू लागले आहे. अनेक विवाह सोहळे हे तर वन-डे मॅचसारखे झाले असून, सकाळी साखरपुडा, दहा वाजता हळद आणि त्याच दिवशी दुपारी लग्न आणि मोजक्याच नागरिकांसाठी जेवण, असे स्वरूप आल्याने ग्रामीण भागात परिस्थितीही बदलली आहे.
चौकट
लग्नसमारंभावर आधारित व्यवसाय कोलमडले
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने कहर केला आहे. दरवर्षी मोठ्या थाटामाटात होणाऱ्या लग्नसमारंभावर बंधने आल्याने यावर आधारित मंडप डेकोरेशन, केटरिंग, वाहन हे व्यवसाय पूर्णपणे कोलमडले आहेत.