कोरोना आला अन् डेंग्यू गेला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:17+5:302021-02-05T04:22:17+5:30

औरंगाबाद : औरंगाबादेत वर्ष २०१९ मध्ये डेंग्यूने अक्षरश: कहर केला होता. तब्बल ५२७ लोकांना डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूच्या ...

Corona came and went dengue! | कोरोना आला अन् डेंग्यू गेला !

कोरोना आला अन् डेंग्यू गेला !

औरंगाबाद : औरंगाबादेत वर्ष २०१९ मध्ये डेंग्यूने अक्षरश: कहर केला होता. तब्बल ५२७ लोकांना डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूच्या संकटातून बाहेर पडत नाही तोच २०२० मध्ये महाभयंकर कोरोनाचा विळखा पडला. या कोरोनाच्या संकटात मात्र डेंग्यूचा उद्रेक गतवर्षीच जाणवलाच नाही. कोरोना आला आणि डेंग्यू गेला, अशीच परिस्थिती जिल्ह्यात पाहायला मिळाली.

पावसाळ्याला सुरुवात होताच डेंग्यू डोके वर काढत असल्याचा अनुभव गेली अनेक वर्षे पाहायला मिळाला. वर्ष २०२० मात्र त्याला काहीसे अपवाद ठरले. कारण कोरोना प्रादुर्भावात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. केवळ ४८ रुग्णांचे गतवर्षी निदान झाले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ४७९ ने रुग्णांची संख्या घटली. एडिस इजिप्ती हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

कुठल्या वर्षात किती पेशंट

२०१६- १३९

२०१७- ८२

२०१८- १५९

२०१९- ५२७

२०२०- ४८

---

डेंग्यूची लक्षणे

१) डेंग्यू एडिस इजिप्ती डासाच्या चावण्याने हा आजार होतो. डेंग्‍यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात.

२) अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्‍यामागे दुखणे, ही प्रमुख लक्षणे आहेत.

३) रक्‍तस्रावित डेंग्‍यू ताप हा डेंग्‍यू तापाची गंभीर अवस्‍था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते. त्‍याच्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात.

४) सुरुवातीच्‍या काही दिवसांत याची लक्षणे साध्‍या डेंग्‍यू तापासारखी असतात आणि क्‍वचित त्‍वचेवर पुरळ दिसून येतात.

५) रक्‍तस्रावित डेंग्‍यू तापाचे निदान अंगावरील दर्शनीय भागावर (हातपाय, चेहरा व मान) यावर आलेल्‍या पुरळांवरून केली जाते.

---

डेंग्यूचा सर्व्हे

जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला घरोघरी जाऊन डास अळींचे सर्वेक्षण करून डासांची उत्पत्ती थांबविली जाते. एकट्या डिसेंबर २०२० मध्ये जिल्ह्यात एक लाख २४ हजार ५११ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात दोन हजार ७३८ घरांतील तीन हजार २५१ भाड्यांत डास अळी आढळून आल्या. ही सर्व डास अळी नष्ट करण्यात आली. वर्षभरात १४२ डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ४८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले.

Web Title: Corona came and went dengue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.