महा-ई-सेवा केंद्रावर पीकविमा भरण्याची सोय
By Admin | Updated: July 14, 2017 00:10 IST2017-07-14T00:02:07+5:302017-07-14T00:10:29+5:30
हिंगोली : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत सन २०१७ मधील खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याची व्यवस्था ही महा-ई-केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन दिल्याने

महा-ई-सेवा केंद्रावर पीकविमा भरण्याची सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत सन २०१७ मधील खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याची व्यवस्था ही महा-ई-केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना आता बँकेत विमा भरण्यासाठी ताटकळत बसण्याची वेळ कायमची टळण्यास मदत होणार आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा प्रस्ताव बँकेत सादर करावयाची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. शेतकऱ्यांचे वेळीच प्रस्ताव सादर करण्यासाठी नॅशनल इंशुरन्स कंपनी लि. ने जिल्ह्यातील १५३ महा-ई-सेवा केंद्रचालकांना प्रस्ताव दाखल करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. अजूनही तालुकानिहाय प्रशिक्षण सुरु असून, शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्रावर विनाशुल्क पीकविमा भरणे सोपे होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रस्तावामागे केंद्र चालकास केंद्र शासनातर्फे २४ रुपये दिले जाणार आहेत. १ जुलैपासून महा-ई-सेवा केंद्रावर पीकविमा भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत ताटकळत बसण्यापेक्षा वेळीच आपापल्या भागातील ई-सेवा केंद्रावर पीकविमा भरावा. दरवर्षी विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी बँकेत होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कंपनीने वेगळ्या यंत्रणेला काम देवून त्यांची संख्या वाढविली आहे. या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्यानंतर त्याला पावती मिळणार आहे. याचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे केले आहे.