मनपा स्थायी सभेत येणार वादग्रस्त विषय
By Admin | Updated: March 19, 2016 20:21 IST2016-03-19T20:03:03+5:302016-03-19T20:21:18+5:30
नांदेड : कामाची तातडी या कारणासाठी विनानिविदा काम करुन घेवून गुत्तेदारांवर लाखोंची खैरात करण्याचे काम मनपात नेहमी सुरुच असते़

मनपा स्थायी सभेत येणार वादग्रस्त विषय
नांदेड : कामाची तातडी या कारणासाठी विनानिविदा काम करुन घेवून गुत्तेदारांवर लाखोंची खैरात करण्याचे काम मनपात नेहमी सुरुच असते़ त्याला स्थायी समितीतही मंजुरी मिळते हे विशेष़ शनिवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीतही अशाच काही वादग्रस्त विषयांचा समावेश आहे़ त्यामुळे समितीतील सदस्य त्यावर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे़
विसावा उद्यानात मत्स्यालयासाठी बांधलेल्या अॅक्यूरियमच्या इमारत दुरुस्तीसाठी म्हणून विनानिविदा २९ लाख ५७ हजार रुपयांचे काम करण्यात आले़ या खर्चाच्या आर्थिक मंजुरीसाठी प्रशासनाने स्थायी समितीच्या प्रस्तावात ठराव ठेवला आहे़ इमारतीत रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था, अल्युमिनिअम खिडक्या, दोन प्रवेशद्वार, सुरक्षा भिंत, रबर मॅट, टिनशेड या कामाचा समावेश आहे़ या सर्व कामाच्या निविदा न मागविता, तातडीचे काम असल्याचा उल्लेख प्रशासनाने केला आहे़ परंतु देयके देण्यापूर्वी कामाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविकेने केली आहे़