कंत्राटदारांना मिळणार थकीत बिले, कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:39+5:302020-11-12T07:28:39+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान, दिवाळी भेट म्हणून तब्बल १ कोटी रुपये वाटप करण्यात येणार ...

कंत्राटदारांना मिळणार थकीत बिले, कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान
औरंगाबाद : महापालिकेतील साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान, दिवाळी भेट म्हणून तब्बल १ कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत. महापालिकेतील अत्यंत छोट्या-छोट्या कंत्राटदारांना ६ कोटी रुपयांचे वाटप बुधवारपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
महापालिकेतील वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला सानुग्रह अनुदान आणि दिवाळी भेट देण्याची परंपरा आहे. मागील वर्षी तत्कालीन आयुक्त निपुण विनायक यांनी निधी नसल्याचे कारण देत सानुग्रह अनुदान आणि दिवाळी भेट देण्याचे नाकारले होते. यावर्षीही कोरोनामुळे मनपाची आर्थिक स्थिती नाजूक असली तरी प्रशासकांनी जुनी चांगली परंपरा जोपासण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान व इतर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील २६३८ कर्मचारी आणि शिक्षण विभागातील ७५ जणांना प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे, तसेच बालवाडी कर्मचारी, सातारा-देवळाईचे सहा कर्मचारी, शिक्षण विभागातील १८१ शिक्षक, रोजंदारीवरील १५८ कर्मचारी, लिंक वर्कर, तासिका तत्त्वावरील शिक्षक, बचत गटाचे ३३१ कर्मचारी यांना प्रत्येकी २ हजार रुपये दिवाळी भेट म्हणून दिली जाणार आहे. ३ हजार ४९५ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि दिवाळी भेट म्हणून १ कोटी १० लाख रुपयांचे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.
छोट्या कंत्राटदारांची दिवाळी जोरात
महापालिकेतील मोठ्या कंत्राटदारांना मागील महिन्यात तब्बल ४० कोटी रुपये देण्यात आले. प्रशासनाने छोट्या कंत्राटदारांची तब्बल ५ कोटी रुपयांची बिले काढण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी कंत्राटदारांचे पेमेंट करण्याचे आदेश लेखा विभागाला देण्यात आले.