बांधकाम खात्यात कंत्राटदाराचा राडा
By Admin | Updated: August 23, 2014 00:55 IST2014-08-23T00:54:31+5:302014-08-23T00:55:33+5:30
जालना : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ व २ च्या कार्यालयात शुक्रवारी एका कंत्राटदाराने अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत कक्षांची प्रचंड तोडफोड केली.

बांधकाम खात्यात कंत्राटदाराचा राडा
जालना : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ व २ च्या कार्यालयात शुक्रवारी एका कंत्राटदाराने अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत कक्षांची प्रचंड तोडफोड केली.
गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम खात्याच्या दोन्ही विभागात तथाकथित कंत्राटदार व सामाजिक कार्यकर्त्यांनी दररोज अधिकारी, कर्मचाऱ्यांना अरेरावी सुरु केली आहे. न केलेल्या कामांच्या बिलांची मागणी करीत हे तथाकथित कंत्राटदार शिवीगाळ करीत धमक्याही देऊ लागले आहेत. दररोजच्या या प्रकाराने अधिकारी-कर्मचारी भयभीत झाले असून ते कार्यालयाकडे फिरकेनासे झाले आहेत.
विशेष म्हणजे या परिसरात पोलिस चौकी आहे. मात्र कर्मचारी तैनात नाही. चौकी २४ तास बंद अवस्थेत आहे. त्यामुळेच तथाकथित कंत्राटदाराचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असणाऱ्या या उपद्रवी मंडळींच्या तथाकथित कारवायांमुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे.
शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एका कंत्राटदाराने या परिसरात अधिकारी-कर्मचाऱ्यांना बिलांच्या कारणावरुन शिवीगाळ करीत धमक्या दिल्या. यासंदर्भात खाजगी सुरक्षा रक्षकाने त्या परिस्थितीची पोलिसांना कल्पना दिली.
मात्र पोलिस फिरकले नाही. त्याचा परिणाम म्हणजे कंत्राटदाराने सायंकाळी ४ च्या सुमारास कार्यालयात येऊन हॉकीस्टीकने कक्षांची तोडफोड सुरु केली. सात कक्षांतील काचांच्या तावदानासह फर्निचरचे मोठे नुकसान झाले. (प्रतिनिधी)