ठेका वाळूचा; तस्करी मातीची
By Admin | Updated: May 29, 2014 00:23 IST2014-05-29T00:08:42+5:302014-05-29T00:23:48+5:30
सेनगाव : तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून भिंगी माती असलेल्या वाळूची मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चोरी होत
ठेका वाळूचा; तस्करी मातीची
सेनगाव : तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून भिंगी माती असलेल्या वाळूची मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चोरी होत असून, बन-बरडा येथील वाळू घाटावर वाळूचा ठेका घेणार्या एजंसीकडून वाळूच्या रॉयल्टी वसुलीबरोबर भिंगी मातीचीही तस्करी केली जात आहे. सेनगाव तालुक्यात पूर्णा नदी पात्र परिसरात भिंगी वाळू तस्करांनी कहर केला आहे. महसूल यंत्रणेच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे शासनाचे लाखों रुपये बुडवत पूर्णा नदी पोखरण्याचा राजरोस उद्योग तालुक्यात संगणमताने चालू आहे. तालुक्यातील बन-बरडा या संयुक्तिक वाळू घाटाचा लिलाव झाला. या ठिकाणी रेती (वाळू) चा ठेका घेणार्या संबंधित एजंसीने नियमानुसार वाळूची वसुली करणे अपेक्षित असताना नियम मोडीत वाळूघाटावर वाळू बरोबर भिंगी मातीचा उपसा चालविला आहे. नदी पात्रातील वाळू उपसा करण्याबरोबर नदी काठावरील मातीचे खोदकाम संबंधिताकडून चालविले जात आहे. दररोज शेकडो ब्रास भिंगी वाळू तस्करी या ठिकाणावरून होत आहे. या शिवाय वाळू उपशाचे नियमही या ठिकाणी धाब्यावर बसविण्यात आले आहेत. परवानगी नसतानाही जेसीबीने वाळूचा उपसा केला जात आहे. शासनाने निर्धारित केलेल्या बारकोडच्या पावत्या देण्याऐवजी बोगस पावत्या देवून रॉयल्टी वसूल केली जात असल्याचा आरोप बन येथील ग्रामस्थांकडून होत आहे. याशिवाय उटी, धानोरा, वझर, सालेगाव या वाळू घाटावर भिंगी रेतीची बिनधास्त चोरी होत आहे. शासनाकडे कोणतेही महसूल शुल्क न भरता स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांच्या मूकसंमतीने हा प्रकार चालू असल्याचा आरोप या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे. बन येथील वाळू घाटावर चालणार्या गैरप्रकारासंबंधी येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे तक्रार करून भिंगी वाळूची तस्करी थांबविण्याची मागणी केली होती; परंतु या तक्रारीची कुठलीही दखल आजपर्यंत घेण्यात आली नसल्याने तालुक्यात संगणमताने शासनाचा महसूल बुडविला जात आहे. (वार्ताहर) जप्त केलेला साठाही गेला चोरीला भिंगी वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून, वृत्तपत्रात सातत्याने बातम्या येत असल्याने येथील तहसील कर्मचार्यांनी पोलिस फौजफाटा घेऊन सालेगाव येथे भिंगी रेती साठ्यावर कारवाई केली होती. या कारवाईत जप्त केलेला साठाच भिंगी तस्करांनी लांबविला असून, एकप्रकारे कारवाईचे आव्हानच शासकीय यंत्रणेला दिले आहे.