ज्येष्ठ नागरिकांचे ठिय्या आंदोलन सुरू
By Admin | Updated: August 14, 2014 02:09 IST2014-08-14T01:54:53+5:302014-08-14T02:09:09+5:30
नांदेड : उतारवयात कुटुंबियांनी दुर्लक्ष केले, नातेवाईकही पाठ फिरवतात आता शासन मायबापच काहीतरी देईल या अपेक्षेने हजारो वृध्द महिला व पुरूष जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देवून बसले आहेत़

ज्येष्ठ नागरिकांचे ठिय्या आंदोलन सुरू
नांदेड : उतारवयात कुटुंबियांनी दुर्लक्ष केले, नातेवाईकही पाठ फिरवतात आता शासन मायबापच काहीतरी देईल या अपेक्षेने हजारो वृध्द महिला व पुरूष जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देवून बसले आहेत़ या आंदोलनाबाबत सायंकाळपर्यंत तरी कोणताही तोडगा निघाला नव्हता़
सहयोग ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने ज्येष्ठांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आल्यानंतर या मोर्चेकऱ्यांनी धरणे धरले़ हे धरणे आता प्रश्न सुटेपर्यंत सुरूच राहतील असा पवित्रा घेतला आहे़
ज्येष्ठांनी वयोमर्यादा ६५ वर्षाऐवजी केंद्र शासनाप्रमाणे ६० वर्ष करावी, सर्व ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची मर्यादा न ठेवता प्रति माह किमान २ हजार ५०० रूपये मानधन सुरू करावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी दारिद्र्य रेषेखालील नाव असणे बंधनकारक असू नये, राजीव गांधी आरोग्यदायी योजनेत उत्पन्नाची अट न ठेवता सर्वच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करावा, सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा शासनाने चालू करावी, १ आॅक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या जेष्ठ नागरिक धोरणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, संपूर्ण राज्यात, मनपा, नपा अंतर्गत सुरू असणाऱ्या बससेवेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेप्रमाणे ५० टक्के सवलत असावी तसेच रेल्वे, विमान प्रवासातही सवलत द्यावी आदी मागण्या केल्या आहेत़
ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य न केल्यास सत्ताधाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसेल असा इशाराही यावेळी देण्यात आला़
ज्येष्ठांच्या मागण्यांसदर्भात २५ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले होते़ त्यामुळे बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते़ पण आठ महिन्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने मूकमोर्चा काढण्यात आल्याचे सहयोग ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ़ हंसराज वैद्य यांनी सांगितले़
या आंदोलनात आनंदराव पाटील, सचीन सोनवणे, डॉ़ पी़ के़ कदम, भास्कर बोकन, ठाकूर, डॉ़ शितल भालके, माधवराव पवार, दिगंबर सोनोणे यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते़
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या या आंदोलनाला शिवसेनेने पाठींबा दिला असून त्याबाबतचे पत्र जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी दिले़ तसेच मराठा महासंघ आणि तिरंगा परिवारनेही पाठींबा दिला आहे़
(प्रतिनिधी)