जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे विभागाची निर्मिती
By Admin | Updated: April 7, 2015 01:21 IST2015-04-07T00:41:28+5:302015-04-07T01:21:09+5:30
जालना : पाटबंधारे विभाग औरंगाबाद कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रावर देखरेख करणे शक्य नसल्याने जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.

जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे विभागाची निर्मिती
जालना : पाटबंधारे विभाग औरंगाबाद कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रावर देखरेख करणे शक्य नसल्याने जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाने १ एप्रिल २०१५ रोजी काढले आहेत.
राज्यात जालना, गोंदिया, भंडारा व गडचिरोली हे चार जिल्हे सिंचनाच्या बाबतीत अतिमागासलेले आहेत. त्यामुळे पालकमंत्री लोणीकर यांनी जालना पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला होता.
सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात पूर्ण झालेल्या व नियमित सिंचन सुरू असलेल्या एकूण प्रकल्पांची संख्या ३९ आहे. त्याद्वारे २५,३०६ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे.
या क्षेत्राच्या सिंचन व्यवस्थापनाकरीता जालना मुख्यालयी दोन उपविभाग कार्यरत असून ते औरंगाबाद पाटबंधारे विभाग यांच्याशी संलग्न आहेत.
जालना लघुपाटबंधारे विभागाकडील पूर्ण झालेले मध्यम व लघुमध्यम प्रकल्पांची संख्या ३८ आहे. त्याद्वारे १८,६१७ हेक्टर क्षमता निर्माण झालेली आहे. असे एकूण ४३.९२३ हेक्टर सिंचन क्षेत्र औरंगाबाद येथून देखरेख करणे शक्य नसल्याने व औरंगाबाद पाटबंधारे विभागाकडील सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याने जालना येथे सिंचनाकरीता एक स्वतंत्र विभाग निर्माण होणे आवश्यक होते.
औरंगाबाद पाटबंधारे विभागासाठी सिंचनाचे पुरेसे क्षेत्र उपलब्ध असून त्याचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तथापि उपरोक्त सिंचनाची आकडेवारी ही एका विभागाकरीता अपुरी असल्याने निम्न दुधना प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना व उजवा व डाव्या कालव्यावरील जून २०१४ अखेर निर्माण झालेली ३१ १६५ हेक्टर सिंचन क्षमता असे एकूण निर्मिती झालेले ७५०८८ हेक्टर सिंचन क्षेत्र एकत्रित करून जालना पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये लोअर दुधना प्रकल्प पूर्ण झालेला असल्यामुळे सिंचनासाठी पाणीसाठा निर्माण झाला आहे. या धरणाच्या पाण्याचा उपयोग हा जालना व परभणी या दोन जिल्ह्यातील शेतीसाठी तसेच पिण्यासाठी होणार आहे.
याशिवाय जालना जिल्ह्यामध्ये कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प, जुई, कल्याण, जीवरेखा धामणा मध्यम प्रकल्प याशिवाय अनेक लघुप्रकल्प पूर्ण झालेले आहेत.
या सर्व मध्यम व लघु प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थापनाचे काम औरंगाबाद पाटबंधारे विभागामार्फत केले जात असे.
मात्र या व्यवस्थापनाच्या कामात काही बाबतीत दुर्लख होताना दिसून आल्याचे शासनाच्या निदर्शनास यापुर्वीच आले होते.
या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र पाटबंधारे विभाग स्थापण्यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले.
१ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन पाटबंधारे विभाग सुरू करण्यात येत असून या विभागासोबतच पाटबंधारे उपविभाग टेंभूर्णी, अंबड व वाटूर असे तीन नवीन उपविभाग तसेच राजूर, वाटूर, परतूर, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी येथे प्रत्येकी एक शाखा कार्यालयांचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)
याबाबत पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, स्वतंत्र विभागाच्या निर्मितीमुळे हा विभाग पूर्ण क्षमतेने जालना जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थापनाची कामे करेल. कालव्याच्या देखभाल दुरूस्तीची कामे नियमित करण्यात येतील. पाणी वापर सहकारी संस्था तातडीने स्थापन करण्यात येतील. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन सुरळीत होईल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यासाठी होईल. पर्यायाने शेतीचा चांगल्या प्रकारे विकास होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल, असा विश्वासही लोणीकर यांनी व्यक्त केला.