चंद्रभागेवरील पूल उभारणीसाठी आंदोलन उभारू
By Admin | Updated: July 20, 2015 00:52 IST2015-07-20T00:35:21+5:302015-07-20T00:52:11+5:30
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद पालखी सोहळा पंढरपूरला जाताना होळे ते कवठाळे येथून चंद्रभागा पार करून जावे लागते. मागील वर्षी याच ठिकाणी अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

चंद्रभागेवरील पूल उभारणीसाठी आंदोलन उभारू
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद
पालखी सोहळा पंढरपूरला जाताना होळे ते कवठाळे येथून चंद्रभागा पार करून जावे लागते. मागील वर्षी याच ठिकाणी अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शासनाने येथे पूल बांधण्यास मंजुरी दिली होती. मात्र, वर्ष उलटले तरी पुलाचे काम सुरू झालेले नाही. हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत या पूल उभारणीसाठी दिंडीवाल्यांशी चर्चा करून आंदोलनाबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथ नारायणबुवा गोसावी यांनी दिली.
श्री क्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर निघालेल्या एकनाथ महाराजांच्या पालखीचे रविवारी सायंकाळी परंड्यात आगमन झाले. येथील देशमुख वाड्यावर या पालखीचा मुक्काम आहे. याप्रसंगी ते बोलत होते. सर्वात पुरातन पालखी सोहळा म्हणून या दिंडीची ओळख आहे. पूर्वी डोक्यावर पादुका घेऊन निघणारी ही पालखी जानकीबार्इंनी सुरू केली. ८ जुलै रोजी अधिव वद्य सप्तमीला पैठणहून निघालेल्या या पालखीची श्री क्षेत्र पंढरपूरदरम्यान चार ठिकाणी रिंगण होतात. यामध्ये मेडसिंगे, पारगाव घुमरे, नांगर डोह आणि कवेदंड या चार ठिकाणांचा समावेश आहे. एकनाथ महाराजांच्या रथापुढे पाच आणि रथामागे १७ दिंड्या सहभागी असून, साधारण प्रत्येक दिंडीत पाचशेजणांचा समावेश आहे. याबरोबरच पालखी मार्गावर गावोगावचे भाविक दिंडीमध्ये सहभागी होत असून, सद्यस्थितीत पालखीत पंधरा हजाराहून अधिक वारकऱ्यांचा समावेश असल्याचे गोसावी महाराज यांनी सांगितले. राज्य शासनाने खास पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्ग उभारले आहेत. मात्र, या पालखी मार्गाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने याचा वारकऱ्यांना त्रास सोसावा लागत असल्याचे ते म्हणाले. खर्डा-तिंत्रज आणि तिंत्रज-देवगाव हा रस्ता काहीसा बरा आहे. मात्र, त्यापुढील रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वागताला शासन स्वत: जाते. मात्र, नाथ महाराजांच्या पालखीचा यथोचित सन्मान होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यात मानाच्या सात पालख्या आहेत. यात एकनाथ महाराजांच्या पालखीला तिसऱ्या क्रमांकाचा मान आहे. पंढरपूरमध्ये पालख्या गेल्यानंतर या पालख्यांचा काला गोपाळपूरमध्ये होतो. मात्र, नाथ महाराजांच्या पालखीचा काला मंदिरात होतो. असे या पालखीचे महत्त्व असतानाही सोहळ्यातील वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पैठणहून निघाल्यापासूनच या पालखीची व्यथा सुरू होते. पालखीचा पहिला मुक्काम कनकवाडी येथे असतो. मात्र, या पहिल्या मुक्कामाला जाण्यासाठी रस्ता नाही. पालखी सोहळ्याला नदी पार कडून कनकवाडी गाठावी लागते. शासनाने काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील पालखी मार्गासाठी ४३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या मार्गावर सर्वात खडतर मार्ग म्हणून ओळख असलेल्या राक्षसभुवन ते रायमोह आणि रायमोह ते गारमाथा या मार्गाचा समावेश केलेला नाही. अत्यंत डोंगराळ भाग असलेल्या या रस्त्यावर वारकऱ्यांचे मोठे हाल होतात. मात्र, त्यानंतरही हा रस्ता पालखी मार्गामध्ये समाविष्ट केलेला नसल्याचे ते म्हणाले.
मराठवाड्यातील सर्वात मोठी पालखी म्हणून ओळख असलेल्या या सोहळ्यासाठी शासनाने खास सोई-सुविधा पुरविण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांचा समावेश असलेल्या या दिंडीसाठी आज केवळ पाण्याचा एक टँकर आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई आहे. अशा स्थितीत टँकरची संख्या वाढविणे आवश्यक होते. मात्र त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला. याबरोबरच पालखी सोहळ्यासोबत अवघी एक रुग्णवाहिका असून, त्यातही वैैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे एखादा वारकरी आजारी पडल्यास अथवा त्याला तातडीच्या उपचाराची निकड भासल्यास जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे लागते. प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सुसज्ज रुग्णवाहिका सोबत देण्याची गरजही गोसावी महाराज यांनी यावेळी व्यक्त केली.