काँग्रेसचा दक्षिण तट अभेद्यच...
By Admin | Updated: May 18, 2014 01:25 IST2014-05-18T01:20:51+5:302014-05-18T01:25:15+5:30
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणार्या नांदेड दक्षिण मतदारसंघाने आपला तट अभेद्यच ठेवला़

काँग्रेसचा दक्षिण तट अभेद्यच...
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणार्या नांदेड दक्षिण मतदारसंघाने आपला तट अभेद्यच ठेवला़ अल्पसंख्याकांच्या मतांचे विभाजन करण्याचा प्रतिस्पर्ध्यांचा डाव त्यांच्याच अंगावर उलटून पडला़ नांदेड उत्तरनंतर अशोकरावांना मताधिक्य देण्यात दक्षिणने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे़ २००९ मध्ये या मतदारसंघात खा़ भास्करराव पाटील खतगावकर यांना ६१०९८ तर भाजपाच्या संभाजी पवार यांना ३७२१६ मते पडली होती़ त्यावेळी भास्कररावांना या मतदारसंघाने २३८८२ मतांची आघाडी दिली होती़ यावेळेस खुद्द अशोकराव चव्हाणच उमेदवार असल्याने मताधिक्य वाढणार हे निश्चित होते़ त्यात दक्षिणमध्ये अशोकरावांना ८८७०० तर डी.बी. पवार यांना ६१६०४ मते पडली़ गतवेळच्या निवडणुकीपेक्षा मताधिक्यात वाढ होवून ते २७०९६ पर्यंत पोहोचले़ मतदारसंघाचे नेतृत्व करीत असलेले आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांची या भागातील कामे, जनसंपर्क तसेच महापौर अब्दुल सत्तार यांचे या भागातील वजन या काँग्रेसच्या जमेच्या बाजू होत्या़ त्याचबरोबर एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसणे हेही काँग्रेसच्या पथ्यावर पडले़ त्यामुळे या भागातील अल्पसंख्याक समाजाची एकगठ्ठा मते अशोकरावांच्या पारड्यात पडली़ मतांचे विभाजन करुन आपला डाव साधण्याचे प्रतिस्पर्ध्यांचे मनसुबे नांदेड दक्षिणच्या मतदारांनी नंदगिरीच्या तटावरुन गोदावरीत नेवून बुडविले हेही निश्चित़ मतदारसंघात जुने नांदेड, धनेगांव, बळीरामपूर, विष्णूपुरी, सिडको आदी भागात कॉॅग्रेसचा वरचष्मा आहे़ ग्रामीण भागात काँग्रेसने केलेली विकासकामे आणि विद्यमान आमदारांचा या भागातील जनसंपर्क याचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला झाला़ अशोकरावांनी दक्षिण नांदेडातील व्यापारी, प्रतिष्ठित मंडळी, विविध समाजातील प्रमुखांच्या बैठका घेतल्या होत्या़ त्याचा चांगला परिणाम झाला़ दक्षिण नांदेडात काँग्रेसची असलेली मजबूत फळी, एमआयचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते काँग्रेसच्या पारड्यात पडली़ शहरासह ग्रामीण भागातील मतदारही अशोकरावांच्या पाठीशी खंबीरपणे होता़